मराठा बांधवावरील गुन्हे विनाशर्त मागे घ्या : मराठा क्रांती मोर्चाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:49 PM2018-12-05T16:49:04+5:302018-12-05T17:06:01+5:30
खेड तालुक्यात ३० जुलै २०१८ रोजी मराठा मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यातील काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.
पुणे : मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलना दरम्यान राज्यातील मराठा समाज बांधवावरील दाखल गुन्हे विनाशर्त मागे घ्या. अशी मागणी शासनाकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. पुढील सात दिवसांच्या आत हे गुन्हे मागे न घेतल्यास १६ डिसेंबर पासून चाकण येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मराठा मोर्चाचे पदाधिकारी मनोहर वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३० जुलै २०१८ रोजी खेड तालुक्यातील मराठा मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यातील काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.काही समाजकंटकांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हिंसाचार घडवून आणला. त्या दंगलीचा ठपका हा मराठा युवकांवर ठेवण्यात आला. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अद्याप राज्यभर मराठा बांधवांचे अटक सत्र सुरू आहे. याविषयी अनेकदा शासनाला सातत्याने निवेदन देऊन देखील शासनस्तरावरून कुठल्याही प्रकारचा आदेश आला नसल्याचे वाडेकर यांनी सांगितले. खऱ्या दोषी असलेल्यावर कारवाई करा. मात्र राजकारण करून मराठा युवकांना वेठीस धरू नये. आतापर्यत २०० पेक्षा जास्त मराठा युवकांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांपूर्वी २३ मराठा युवकांना अटक करण्यात आल्याचे भगवान पाटील यांनी सांगितले. खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्यात त्यांनी खेड येथील मराठा मोर्चा प्रकरनाचा तपास एस आयटी मार्फत व्हावी. अशी मागणी केली. यामुळे शांत झालेल्या वातावरण पुन्हा पेटले गेले. याचा त्रास मात्र निष्पाप मराठा युवकांना सहन करावा लागला. स्थानिक आमदार यांच्या अशाप्रकारच्या राजकारणाचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारयांनी निषेध केला.