टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने परत करा; न्यायालयाचा आदेश
By विवेक भुसे | Published: February 13, 2024 12:29 PM2024-02-13T12:29:24+5:302024-02-13T12:31:12+5:30
जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्वीनकुमार याच्या बंगळुरु येथील घरातून सुमारे २४ किलो चांदी, दोन किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले होते
पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. टीईटी प्रकरणात जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्वीनकुमार याच्या बंगळुरु येथील घरातून सुमारे २४ किलो चांदी, दोन किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले होते. त्याचे दागिने काही अटीवर परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा घोटाळ्यात अश्वीनकुमार याला २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. यावेळी त्याच्या बंगळुरु येथील घरातून मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त केला होता. तसेच तत्त्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे याच्याकडेही तब्बल पावणे चार कोटींची रोख रक्कम व ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अश्विनकुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असून खटला दोषारोप पत्र निश्चितीसाठी प्रलंबित आहे. अश्विनकुमार याच्या वतीने अॅड. मिलिंद पवार, अॅड. अक्षय शिंदे, अॅड. हर्षवर्धन पवार यांनी सायबर पोलिसांनी जप्त केलेले जवळपास एक कोटी रुपयांचे सोने चांदी व हिºयांचे दागिने आरोपीला परत मिळावेत, असा अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ पी़ खंदारे यांनी अश्विनकुमार यांनी २० लाख रुपयांचे बंधपत्रावर व खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटीवर अर्ज मंजूर केला व दागिने परत करण्याचा आदेश दिला आहे.