भूखंडाच्या खरेदीसाठी घेतलेले ४ लाख ७२ हजार ५०० रुपये व्याजासह परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:15 AM2021-08-13T04:15:41+5:302021-08-13T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता, त्यासाठी घेतलेली टोकन रक्कम ग्राहकाला परत देण्यास टाळाटाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता, त्यासाठी घेतलेली टोकन रक्कम ग्राहकाला परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वेरासिटी लँडमार्क प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व तिच्या संचालकाला तक्रारदारांना भूखंडाच्या खरेदीसाठी घेतलेले ४ लाख ७२ हजार ५०० रुपये स्वीकारल्याच्या तारखेपासून १२ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. निकालापासून ४५ दिवसांच्या आत ही रक्कम न दिल्यास त्यावर १५ टक्के व्याज आकारण्यात येईल, तसेच तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी २५ हजार व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये देण्यात यावे, असेही आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे.
पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे व अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी, संजय मोरेश्वर खापरे (रा. धायरी) यांनी ग्राहक आयोगाकडे वेरासिटी लँडमार्क प्रमोटर्स प्रा. लि. आणि कंपनीचे संचालक धीरज तामचीकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांतर्फे अड. लक्ष्मण कुमार जाधव यांनी बाजू मांडली.