नादुरुस्त मोबाइलचे पैसे ग्राहकाला परत करा : ग्राहकमंचाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:01 PM2018-08-22T20:01:33+5:302018-08-22T20:02:49+5:30
मुलीला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी काझी यांनी टेलिव्हीजन चॅनल शॉप सीजेवरून प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सेलमधून झोलो कंपनीचा मोबाइल फोन खरेदी केला होता.
पुणे : नवीन मोबाइल सुरूच झाला नसल्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष करणा-या कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदाराला मोबाइलचे ५ हजार १४८ रुपये परत द्यावे. त्याचबरोबर ५ हजार रुपयांची नुकसानभरपाई, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष वाय. डी. शिंदे, सदस्या क्षितीजा कुलकर्णी यांनी हा दावा निकाली काढला.
साजिद झैनीउद्दीन काझी ( रा. शनिवार पेठ ) यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी शॉप सीजे नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ( स्टार सीजे प्लाझा, सहावा मजला, डॉ. डीबी मार्ग, ग्रॅन्ट रोड, मुंबई), कस्तुरी मेगा व्हेन्चर्स प्रा. लिमिटेडचे संचालक मयांक पाटीदार, काला पाटीदार ( लाला लजपतराय कॉलनी, एरिया कॉलनी, भोपाळ, मध्यप्रदेश), लावा इंटरनॅशनल लिमिटेड ( नोएडा, उत्तरप्रदेश), सिद्धीविनायक एंटरप्रायझेस, नितीन भोसले (झोलो सर्व्हिस सेंटर, अच्युत प्रसाद अपार्टमेंट, नळ स्टॉप) यांच्याविरुद्ध मंचाकडे तक्रार दाखल केली होती.
मुलीला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी काझी यांनी टेलिव्हीजन चॅनल शॉप सीजेवरून प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सेलमधून झोलो कंपनीचा मोबाइल फोन खरेदी केला होता. आॅर्डर दिल्यानंतर त्यांना २३ जानेवारी २०१७ रोजी मोबाइलची डिलीव्हरी मिळाली. मोबाइलचे पार्सल उघडले असता बिलावर त्यांचे आडनाव चुकीचे असल्याचे लक्षात आले. तसेच बिलावर सिरीयल नंबर आणि इएमइआय नंबर देखील नव्हता. मोबाइलच्या मॅन्युअलमध्ये देण्यात आलेल्या सूचनेनुसार त्यांनी फोन चार तास चार्जिंग केला. मात्र, तरीही मोबाइल सुरू झाला नाही. मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना त्याला हात लावल्यास करंट बसत होता. मोबाइलवर उत्पादनाची तारीख सप्टेंबर २०१४ होती.
हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला. त्यांना कंपनीच्या सर्व्हिस सेंटरकडे जाण्यास सांगितले. सेंटरमधून दोनदा मोबाइल बदलून देण्यात आला. मात्र तरीही मोबाइलम सुरू झाला नाही. याबाबत संबंधितांकडे वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काझी यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता.
तक्रारदार यांनी मंचाकडे प्रतिज्ञापत्र आणि संबंधित कागदपत्रे दाखल केली. विरुद्ध पक्षाकडे मेलद्वारे साधण्यात आलेल्या संपर्काची छापील प्रतही त्यांनी दाखल केली. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदाराला सेवा देताना त्रुटी राहिली असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंचाने मोबाइलची रक्कम, नुकसान भरपाई म्हणून ५ हजार आणि तक्रारीचा ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.