दलितांची गाव वापसी करा - जिग्नेश मेवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:32 AM2019-01-21T03:32:53+5:302019-01-21T03:32:57+5:30
देशात भूमिहीन कोण, मंदिराची घंटा कोण वाजविणार, गटारात कोण उतरणार हे जातिव्यवस्था ठरविते.
पुणे : देशात भूमिहीन कोण, मंदिराची घंटा कोण वाजविणार, गटारात कोण उतरणार हे जातिव्यवस्था ठरविते. आजही ९० टक्के दलित गावकुसाच्या बाहेर राहत आहेत. त्यांना गाव आपले वाटत नाही. काही जण ‘घरवापसी’ची मोहीम उघडतात. पण आधी आमची ‘गाव वापसी’ करा, अशी दलितांची भावना असल्याचे गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले.
एमआयटी विश्वशांती विद्यापिठामध्ये आयोजित भारतीय छात्र संसदेतील ‘जातीयता आणि भ्रष्टाचार : लोकशाहीवरील सर्वात मोठा डाग’ या विषयावर मेवाणी म्हणाले, मागील २५ वर्षांत देशाचा विकासदर वेगाने वाढत गेला पण आजही जातीयवाद हा लोकशाहीवरील डाग असल्याचे लोकांना मान्य करावे लागते. देशात दररोज चार ते पाच दलित महिलांवर बलात्कार, आठ ते दहा दलितांच्या हत्या आणि प्रत्येक १८ मिनिटांत दलित अत्याचाराचे गुन्हे दाखल
होत आहेत.
दलितविरोधी मॉडेल
गुजरातमधील दलितांना हक्काच्या जमिनीसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. १२ वर्षांपासून त्यासाठी लढा देऊनही एक इंचही जमीन मिळालेली नाही. उद्योजकांना मात्र जमीन दिली जाते, अशी टीका मेवाणी यांनी केली.