दोन लाखांचा कॅमेरा असलेली बॅग परत करून दाखविले माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:35+5:302021-02-25T04:11:35+5:30
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती साजरी करण्यात येते. येथे विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, नागरिक हजेरी लावतात. त्यावेळी ...
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती साजरी करण्यात येते. येथे विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, नागरिक हजेरी लावतात. त्यावेळी तुषार डाके हा तरुण देखील तिथे उपस्थित होता. कॅमेरा असलेली बॅग रस्त्यावर पडलेली त्याला दिसली. बराच वेळ झाले तरी कोणी बॅगसाठी आले नाही. बॅग चुकून पडली असावी, असा विचार करत त्याने ती स्वतःकडे ठेवली. त्या बॅगेत महागडा कॅमेरा असल्याचे लक्षात येताच त्याने ती बॅग चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केली.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण खैरे आणि त्यांचे सहकारी चेतन येवले स्टेशनमध्ये बॅग गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी सुभाष आव्हाड यांनी तत्काळ चौकातील सीसीटीव्ही तपासले असता, यात दोन जण रस्त्यावर पडलेली बॅग उचलत असल्याचे दिसून आले. अधिक तपासासाठी जात असतानाच डाके हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. कॅमेरा असलेली बॅग सापडली असून ती जमा करण्यासाठीच आलो आहे. असे सांगताच येवले याने गळा भेट घेतली. डाकेने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल वरीष्ठ पोलीस निरीक्षक जाधव, खैरे, सुहास तळेकर, डॉ. भाऊसाहेब जाधव, योगेश शितोळे यांनी डाके याचे कौतुक करून त्याचा सत्कार केला व आभार मानले.