पेट्रोलचोरीतून खुनाचा गुन्हा उघड; तिघांना अटक करत फरासखाना पोलिसांनी केल्या ६ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 03:35 PM2018-01-13T15:35:55+5:302018-01-13T15:39:26+5:30
बुधवार पेठेत पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असलेल्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चाकण येथील डिसेंबरमधून खुनाचा गुन्हा उघडकीस आला.
पुणे : बुधवार पेठेत पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असलेल्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चाकण येथील डिसेंबरमधून खुनाचा गुन्हा उघडकीस आला़ अटक केलेल्या तिघांकडून पोलिसांनी ६ दुचाकी व मोबाईल फोन हस्तगत केला आहे़
शिवशंकर बाळासाहेब मोरे (वय १९, रा़ मु पो़ खराबवाडी, चाकण, ता़ खेड), नवनाथ शांताराम बच्चे (वय २०, रा़ साई रेसिडेन्सी, चाकण) आणि किरण कैलास बंदावणे (वय २२, रा़ बंदावणे शिवार, मु पो़ कडुस, ता़ खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली़ फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकातील हवालदार बापुसाहेब खुटवड व पोलीस कॉन्स्टेबल अमेय रसाळ हे रात्र गस्तीवर असताना बुधवार पेठ भागातील रहिवाशांच्या पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असताना शिवशंकर मोरे याला पकडले़ त्याच्या मदतीने त्याचे दोन साथीदार नवनाथ बच्चे आणि किरण बंदावणे पकडण्यात आले़ त्यांच्याकडील मोटारसायकल ही कसबा पेठेतून १० जानेवारीला चोरीला गेल्याचे आढळून आले़ अधिक चौकशी केल्यावर त्यांनी ६ दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले़ त्या खडक, शिवाजीनगर, विश्रामबाग, खडकी या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत़ दोन गाड्यांंच्या मालकांचा शोध सुरु आहे़
या संबंधी तिघांकडे वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करीत असताना त्यांनी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी रात्रीचे वेळी चाकण एमआयडीसी मध्ये ए़ आऱ ए़ आय कंपनी ते सारासिटी रोडवर कंपनीतून सुटलेल्या एकाला रस्त्यात आडवून त्याचे खिसे तपासत असताना प्रतिकार केल्याने त्याला खाली पाडून त्याचे तोंडावर मोठे दगड टाकून खुन केल्याची कबुली दिली़ याबाबत चाकण पोलिसांकडे चौकशी केली असता १९ डिसेंबर २०१७ रोजी तेथे खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली़ धनंजय साहेबराव चौधरी (वय ३६, रा़ संतनगर, मुळशी प्राधिकरण, ता़ हवेली) असे त्यांचे नाव होते़ चौधरी हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील राहणारे असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत़ चाकण पोलिसांना रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला आढळून आला होता़ ४ दिवसांनंतर त्यांची ओळख पटली होती़
हे तीनही आरोपी वेगवेगळ्या कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात़ त्यांना दारूचे व्यसन असून पैशासाठी चाकण एम़ आय़ डी़ सी़ मधून रस्त्याने घरी जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू व रक्कम जबरदस्तीने काढून घेत असल्याचे आरोपींनी सांगितले आहे़ या आरोपींचे पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नाही़ त्याबाबत तपास सुरु असल्याचे उपायुक्त तेली यांनी सांगितले़
ही कामगिरी उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, राजेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, अमेय रसाळ, संदीप पाटील, विनायक शिंदे, दिनेश भांदुर्गे, हर्षल शिंदे, इक्बाल शेख, योगेश जगताप, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर देवकर, शंकर कुंभार, विकास बोºहाडे, अमोल सरडे, विशाल चौगुले, राजन शिंदे यांच्या पथकाने केली़