अक्षय वल्हाळच्या खुनाचा बदला; आरोपीच्या भावावर गोळीबार अन् कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:59 AM2022-12-29T10:59:15+5:302022-12-29T10:59:33+5:30
पुण्याच्या बुधवार पेठेत बदल्याच्या भावनेतून खुनी खेळ
पुणे/ किरण शिंदे : पुण्यातील नाना पेठेत काही दिवसांपूर्वी अक्षय वल्हाळ या तरुणाची कोयत्याने आणि दगडविटाणे मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठेत मंगळवारी थरारक घटना घडली. अक्षयचा खून करणाऱ्या आरोपीच्या भावावर गोळीबार करून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. बुधवार पेठेतील रामेश्वर चौकात हा सर्व थरार घडला. या घटनेत शेखर अशोक शिंदे (वय 32) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी रूपेश जाधव, गणेश इमुल, निरजन कटकम, कृष्णा बिंटलिंग व कृष्णा गाजुल व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेखर शिंदे याने तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गंभीर रित्या जखमी असलेल्या शेखरच्या भावाने काही महिन्यांपूर्वी नाना पेठ येथे अक्षय वल्हाळ याचा खून केला होता. त्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान, मंगळवारी रात्री शेखर रामेश्वर चौकातून दुचाकीवरून निघाला होता. यावेळी पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले. "तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्हाळ याचा मर्डर केल्याचा बदला म्हणून आज तुझा मर्डर करणार आहे. जिवंत सोडणार नाही" असे म्हणून एकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले व डोक्यात गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
दरम्यान भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या शेखरला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत.