वर्षभरात ११0 कोटींचा महसूल

By admin | Published: January 8, 2016 01:42 AM2016-01-08T01:42:49+5:302016-01-08T01:42:49+5:30

अनधिकृत गौणखनिज उत्खनन, वाहतूक व रॉयल्टीच्या माध्यमातून ३१ डिसेंबरअखेर शासनाने जिल्ह्यातून तब्बल ११० कोटींचा महसूल जमा केला आहे

Revenue of 110 crores in the year | वर्षभरात ११0 कोटींचा महसूल

वर्षभरात ११0 कोटींचा महसूल

Next

लोणी काळभोर : अनधिकृत गौणखनिज उत्खनन, वाहतूक व रॉयल्टीच्या माध्यमातून ३१ डिसेंबरअखेर शासनाने जिल्ह्यातून तब्बल ११० कोटींचा महसूल जमा केला आहे. यामध्ये हवेलीचा वाटा ७५ कोटी ३६ लाख ८१ हजारांचा असून, अव्वल स्थान मिळविले आहे. त्यानंतर दौंड तालुका असून ११ कोटी २० लाख ४५ हजार ७५२ रुपये जमा झाले आहेत. तर, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या वेल्हे तालुक्यातून ८ लाख २७ हजार ६२४ रुपये व भोर तालुक्यातून ७० लाख ७ हजार रुपये महसूल जमा झाला आहे.
हवेली तालुक्याला पुणे जिल्ह्यातील दगडखाणीचे आगार समजले जाते. वाघोली, भावडी, लोणीकंद, नांदोशी, येवलेवाडी व मांगडेवाडी या गावांच्या परिसरात मोठ्या दगडखाणी आहेत. राजकारणात मातब्बर असलेल्या अनेक नेत्यांची दगडखाण, स्टोन क्रशर संघटना हवेलीत असल्यामुळे त्यांचा वेगळाच दबदबा या व्यवसायात कायम आहे. मात्र, हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार दगडू कुंभार यांच्या आदेशानुसार महसूल पथकाने दगडखाणीची मोजणी करून दंडात्मक कारवाई केल्याने कोट्यवधीचा महसूल तिजोरीत जमा होऊ लागला आहे. वाळू माफियांवर कारवाईचा फास आवळून भर टाकली आहे. (वार्ताहर)
दौंड परिसरातील भीमा नदीपात्रातून २२ बोटी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. दरम्यान, गेल्या महिनाभरात बेकायदेशीर वाळूउपसा करणारे १0 जेसीबी, ३६ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. ३६ वाहनांच्या पोटी ३५ लाख रुपये दंड वसूल झाला असून, १ एप्रिल ते आजपावेतो ४८६ वाहनांवर कारवाई करून २ कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महसूल खात्याने वाळूमाफियांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. कानगाव, शिरापूर, खानोटा या परिसरातील भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या बोटी जप्त करून, त्या तहसील कचेरीच्या परिसरात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने जप्त केलेली वाळूची वाहने तहसील कचेरी परिसरात असल्याने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची जत्राच भरली असल्याचे चित्र आहे.
वाळूमाफियांची मुजोरी मोडीत काढणार
दौंड तालुक्यात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती वेळोवेळी मिळत असल्याने त्यानुसार महसूल खात्याचे पथक तातडीने घटनास्थळी जाऊन वाहने जप्त करण्याचे कामकाज करीत आहेत. त्यानुसार मी स्वत: आणि नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके आणि महसूल विभागाचे कर्मचाऱ्याचे एक पथक नेमण्यात आले असून, त्यानुसार अवैध वाळूउपशावर टेहाळणी करीत आहेत. भविष्यात कुठल्याही वाळू माफियांची मुजोरी मोडीत काढणार, परिणामी त्यांना आळा बसविल्याशिवाय महसूल खाते गप्प बसणार नाही, असे तहसीलदार उत्तम दिघे म्हणाले.
वाळूमाफियांचा
फास आवळला
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या नियोजनाखाली झालेल्या बैठकीत कडक कारवाईचे आदेश दिले गेले आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींकडून वाळू माफियांना आवर घालण्याची मागणी होऊ लागल्याने कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सर्वाधिक वाळूचोरी होणाऱ्या भागात तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार होणार असून ते वाळूचोरी रोखण्यासाठी गस्त घालतील. वाळू माफियांना लगाम घालण्यासाठी, चोरीची वाळू रस्त्यांवर येण्यापूर्वीच उत्खनन करतानाच संबंधितावर कारवाई होणार असल्याने अजूनही जिल्ह्यातून दंडात्मक महसूल वाढण्याची शक्यता आहे.
- शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी तथा
जिल्हा खनिकर्म विभागप्रमुख

Web Title: Revenue of 110 crores in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.