वाळूमाफियांना महसूलचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:36 AM2019-03-10T02:36:08+5:302019-03-10T02:37:41+5:30
वाळूउपसा करणाऱ्या ठिकाणांवर छापा; दोन अत्याधुनिक बोटी पेटविल्या; २ पोकलेन मशिन व ३ ट्रॅक्टर जप्त
लोणी काळभोर : महसूल पथकाने येथील मुळा-मुठा नदीपात्रात अनधिकृतपणे सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा करणाऱ्या ठिकाणांवर मध्यरात्री छापा टाकून एका ठिकाणी दोन पोकलेन मशिन व तीन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. तर, दुसºया ठिकाणी नदीपात्रात वाळूउपसा करणाºया दोन अत्याधुनिक बोटी पेट्रोलचा वापर करून पेटवून दिल्या आहेत. अलीकडच्या काळातील महसूल विभागाची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या संदर्भात एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोरचे तलाठी दादासाहेब शंकर झंजे यांनी दिलेल्या फिर्यादी ८ मार्च रोजी हवेली तहसीलदार यांनी लोणी काळभोरच्या हद्दीत असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात अनधिकृतपणे वाळूउपसा करणाºया ठिकाणी कारवाई करा, असा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी थेऊर व उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोणी काळभोरचे तलाठी दादा झंजे, पिंपरी सांडसचे तलाठी निवृत्ती गवारी, उरूळी कांचन तलाठी प्रदीप जवळकर, थेऊरचे तलाठी दिलीप पंलाडे, आळंदी म्हातोबाची तलाठी योगिराज कनिचे कोतवाल दशरथ वगरे या महसूल पथकाने स्थानिक पोलिसांनी मदतीने थेऊर-लोणी काळभोर शिवेवरील जागडे वस्ती येथे रात्री साडेअकराच्या सुमारास अवैध वाळू उत्खननावर धाड टाकली. त्यावेळी सदर ठिकाणी ६ ते ८ इसम दोन पोकलेन मशिन व तीन ट्रॅक्टरच्या साह्याने वाळूउपसा करताना आढळून आले. सदर इसमांना महसूल व पोलीस पथकाची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. परंतु, तेथे नदीपात्रात या पथकाला सैनी कंपनीचे एक व टाटा कंपनीचे एक अशी दोन पोकलेन मशिन आणी न्यू हॉलंड कंपनीचे दोन व महिंद्रा कंपनीचा एक असे तीन ट्रॅक्टर मिळून आले. उपसा केलेल्या वाळूचे ढिग दिसले. रात्रीचे वेळी अंधार असल्याने पंचनामा करण्यासाठी अडचण आली म्हणून सदर पथकाने रात्री तेथेच मुक्काम केला. आज सकाळी पंचनामा केला. अनेक दिवस हवेलीच्या पूर्व भागातील मुळा-मुठा नदीपात्राची बेसुमार लचकेतोड वाळूमाफियांनी केली असून ‘रात्रीस खेळ चाले’ हा प्रकार पाहून महसूल पथकही काही तास गांगरुन गेले. या कारवाईमुळे काही प्रमाणात वाळूमाफियांनी धसका घेतला असून नदी पात्रालगतची अवैध मशिनरी सुरक्षित जागी हलवली आहे. सदर यंत्रणा व वाळूउपसा उपसा थेऊर येथील गणेश मारूती कुुंजीर हा करत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी संबंधितावर कारवाई न करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला, कारवाई न करणेकामी
विनंती केल्या. मात्र, मंडलाधिकारी दीपक चव्हाण व महसूल पथक कारवाईवर ठाम राहिल्याने अनेक वाळूमाफियांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.
नदीपात्रात वाळूमाफियांनी सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे. त्याची रुंदी अंदाजे वीस फूट असल्याने एकावेळेस दोन अवजड वाहने सहजरित्या ये-जा करत असल्याचे आढळले. सुमारे पंधरा ते वीस फूट खोल नदीपात्राचे उत्खनन करून शासकीय गौणखनिजाची चोरी केल्याचे आढळले आहे.
एमआयटी युनिव्हर्सिटीच्या पश्चिमेला असलेल्या नदीपात्रातील वाळूउपसा करत असलेल्या दोन अत्याधुनिक बोटी महसूल पथकाने पेट्रोल ओतून पेटवून देऊन उद्ध्वस्त केल्या. २ पोकलेन मशिन व ३ ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे.
पोकलेन व ट्रॅक्टरवर नंबरच नसल्याने महसूल पथकाची मोठी अडचण झाली असून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, वाहनांवर नंबरच नसल्याने खरोखर कारवाई होणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मशीनरी व ट्रॅक्टरची रात्रभर राखण करावी लागली. शेवटी महसूल पथकाने दुपारी बारा वाजता थेऊर व लोणी काळभोर येथील पोलीस पाटील यांच्याकडे संबधित मशिनरी सोपवून ताबे पावती केली आहे.
अवैधपणे गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. याबाबत सर्व मंडलाधिकाऱ्यांना व तलाठ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून अवैधपणे उत्खनन व वाहतूक होत असल्यास संबंधित वाहने जप्त केली जातील. प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबधिताना दिलेले आहेत.
- सुनील कोळी,
तहसीलदार हवेली