Maharashtra: राज्यात दस्त नोंदणीतून २९ हजार कोंटीचा महसूल, तीन महिन्यांत अपेक्षित १६ हजार अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:02 AM2024-01-04T10:02:02+5:302024-01-04T10:02:14+5:30
रेडीरेकनरच्या दरावर दस्तनाेंदणी अवलंबून...
पुणे : यंदा दस्त नोंदणीतून किमान ४५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळावा, असे उद्दिष्ट राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागापुढे ठेवले आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर या काळात आतापर्यंत २९ हजार २०८ कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी १६ हजार कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा विभागाने व्यक्त केली आहे.
कोरोनाची काजळी दूर झाल्यानंतर गेल्यावर्षी दस्त नोंदणीतून राज्याला ४४ हजार ३३९ कोटी ११ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता, प्रत्यक्षात राज्य सरकारकडून नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाला ३२ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एकूण उद्दिष्टाच्या सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा जादा महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला दिला होता. त्यामुळेच २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने विभागाला ४५ हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर या काळामध्ये २९ लाख ४८ हजार ४२३ दस्तांची नोंदणी झाली असून त्यापोटी २९ हजार २०८ कोटी ६१ लाख रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.
रेडीरेकनरच्या दरावर दस्तनाेंदणी अवलंबून
जानेवारी, फेब्रुवारी व मार्च हे तीन महिने दस्त नोंदणीसाठी महत्त्वाचे असतात. रेडीरेकनरचे दर जाहीर होण्यापूर्वी मार्चमध्ये सर्वाधिक दस्त नोंदणी होत असते. गेल्यावर्षी रेडीरेकनरचे दर जैसे-थे ठेवल्यानेच यंदा दस्त नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरचे दर कसे राहतात, यावरही दस्त नोंदणी अवलंबून असणार आहे.
महिना दस्त नोंदणी- महसूल (कोटींत)
एप्रिल ३,२२,७४०--३२२१.८
मे ३,३३,३४२--३६२६.६८
जून ३,६३,९९६--३१७६.०३
जुलै ३,१५,९३९--३०५४.६
ऑगस्ट ३,२२,४४१--३१००.७६
सप्टेंबर ३,०९,५८८--३५१०.६९
ऑक्टोबर ३,२४,५०७--३१४२.८
नोव्हेंबर २,९२,३५५--३०५९.६९
डिसेंबर ३,४३,५१५--३३१५.९८
एकूण २९,४८,४२३--२९,२०८.६१
यंदा एप्रिल ते डिसेंबर या काळामध्ये सरासरी प्रतिमहिना तीन ते सव्वातीन लाख दस्तांची नोंदणी झाली आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळामध्ये ही दस्त नोंदणी २ ते अडीच लाख इतकी झाली होती. त्यामुळे २०२३ च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या काळामध्ये प्रतिमहिना सुमारे एक लाख दस्त नोंदणी वाढली आहे. त्यामुळेच उर्वरित तीन महिन्यांच्या काळामध्ये १६ हजार कोटींचे लक्ष्य सहज गाठता येईल. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रतिमहिना सरासरी दस्त नोंदणीत वाढ झाली आहे. त्यामुळे उर्वरित उद्दिष्ट सहज गाठता येईल, अशी अपेक्षा आहे.
- अभिषेक देशमुख, उपनोंदणी महानिरीक्षक