हवेलीत २३ वाहनांवर महसूलची कारवाई
By Admin | Published: January 22, 2016 01:35 AM2016-01-22T01:35:54+5:302016-01-22T01:35:54+5:30
हवेलीचे नवीन तहसीलदार दशरथ काळे यांनी बुधवारी सायंकाळनंतर अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या २३ वाहनांवर धडक कारवाई केली.
लोणी काळभोर : हवेलीचे नवीन तहसीलदार दशरथ काळे यांनी बुधवारी सायंकाळनंतर अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या २३ वाहनांवर धडक कारवाई केली. यांतील ११ वाहने रात्रीचा फायदा घेऊन पळून गेली. त्यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईमध्ये तहसीलदार स्वत: तब्बल ५ तास सहभागी झाले होते. सायंकाळी ६ ते रात्री दीडपर्यंत महसूल विभागाने ही धडक कारवाईची मोहीम राबविली. नायब तहसीलदार समीर यादव, हडपसरचे मंडलाधिकारी संतोष सोनवणे, थेऊरचे मंडलाधिकारी हरिदास चाटे यांच्या महसूल पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
पथकाने गुप्तपणे खबरदारी घेऊन मुख्य मार्गावरून जाणाऱ्या २३ वाहनांवर धडक कारवाई केली. लोणी काळभोर परिसरातून १० वाहने ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिली. यामध्ये ८ वाहने वाळूची, एक मातीचे व एक खडी वाहतुकीचा ट्रक आहे. या वेळी कोणत्याही वाहनचालकांकडे शासकीय चलन आढळून आले नाही.
उरुळी कांचन परिसरातून २ अनधिकृत वाळूवाहतूक करणारी वाहने पकडून, पंचनामा करून येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. कारवाई टाळण्यासाठी अवैध गौण खनिज वाहतूकदारांनी सोरतापवाडी येथील पेट्रोलपंपाच्या मागील बाजूला आश्रय घेतला होता. तेथे जावून ११ वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या एका चाकातील हवा सोडून पंचनामा करून संबंधित ११ वाहने महसूल पथकाने जागामालकाच्या स्वाधीन केली. (वार्ताहर)