तिकीट रद्दने रेल्वे मालामाल : वर्षभरात तब्बल ३२ कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 06:43 PM2019-04-26T18:43:04+5:302019-04-26T18:49:26+5:30
आरक्षित, तात्काळ, प्रतिक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी विविध कारणांमुळे रद्द केल्याने मध्य रेल्वे मालामाल होत आहे.
पुणे : आरक्षित, तत्काळ, प्रतिक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी विविध कारणांमुळे रद्द केल्याने मध्य रेल्वे मालामाल होत आहे. रद्द तिकिटाच्या रकमेतून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत यामध्ये सुमारे तीन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मागील काही वर्षांत प्रवाशांसाठी विविध सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या मार्गावर आल्या आहे. तिकीट आरक्षणासह विविध सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दी कमी झाली आहे. चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करता येते. तसेच काही तास आधी तत्काळ तिकिटाचीही सुविधा आहे. पण अनेकदा काही कारणांमुळे आरक्षित तिकीट रद्द करावे लागते. त्यासाठी रेल्वेकडून प्रति प्रवासी शुल्क घेतले जाते. रेल्वेची प्रवासी संख्या वाढत चालल्याने तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मागील वर्ष भरता प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटाच्या माध्यमातून रेल्वेला शुल्करुपाने ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. याचा अर्थ दररोज सुमारे ९ लाख रुपये महसूल मिळत आहे. रेल्वेकडून आरक्षित, तात्काळ, प्रिमियम तत्काळ, अंशत: आरक्षित आणि प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द करता येते. वातानुकूलित (एसी) प्रथम श्रेणी/एक्झिक्युटिव्ह, एसी टू टायर प्रथम श्रेणी, एसी थ्री टायर चेअर कार, एसी थ्री एकॉनॉमी, शयनयान श्रेणी आणि द्वितीय श्रेणी यांसह आरक्षणाची स्थिती व तिकीट रद्दच्या कालावधीनुसार प्रति प्रवासी शुल्क आकारले जाते. अनेक प्रतिक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट आरक्षित होत नाही. त्यामुळे हे प्रवासी तिकीट रद्द करण्याचे प्रमाण अधिक आहे.
---------
आरक्षित तिकीट गाडी सुटण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी रद्द केल्यास प्रथम श्रेणीसाठी २४० रुपये, टू टायरसाठी २००, थ्री टायरसाठी १८० आणि द्वितीय श्रेणीसाठी ६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर १२ तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या २५ टक्के आणि ४ तास आधी रद्द केल्यास ५० टक्के रक्कम शुल्क म्हणून घेतली जाते. गाडी सुटण्याच्या वेळेत किंवा चार तासांत तिकीट रद्द केल्यास तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत. त्याचप्रमाणे तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ तिकीट रद्द केल्यासही पैसे परत केले जात नाहीत. प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द करण्यासाठी शुल्क आकारले जाते. गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तिकीट रद्द केल्यास ६० रुपये शुल्क घेतले जाते. त्यानंतर मात्र पैसे परत मिळत नाहीत.
तिकीट रद्दमुळे मिळालेला महसुल
वर्ष महसुल
२०१८-१९ ३२ कोटी
२०१७-१८ २९ कोटी