महापालिकेच्या कर वसुलीसाठी मिळकती जप्तीच्या कारवाईत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:01 PM2019-02-18T12:01:37+5:302019-02-18T12:09:24+5:30
महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
पुणे: महापालिकेच्या वतीने जास्तीत जास्त मिळकतर कर वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरु केली आहे. यामुळेच महापालिकेला १५ फेब्रुवारी अखेरपर्यंत १ हजार ३६ कोटींचा मिळकत कर वसुलीचा टप्पा गाठता आला.
महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत १ हजार ३६ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. शहरामध्ये तब्बल ९ लाख मिळकतींच्या नोंदी असून, त्यांच्या कराची मागणीही सुमारे १२०० कोटींवर आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कर वसूली शिल्लक आहे. त्यामुळे या विभागाकडून पुढील दोन महिन्यांत जास्तीत जास्त थकबाकी वसूलीसाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे सह महापालिका आयुक्त विलास कानडे यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी महापालिकेला मिळकतकरातून १०८४ कोटी रुपये मिळाले होते. यंदा १८०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले असले तरी प्रशासनाला यामधून १२०० ते १३०० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात जास्तीत जास्त थकबाकी वसुल करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठीच प्रशासनाच्या वतीने खास पथकांची नियुक्ती केली असून, यामध्ये बँन्ड पथकाचा देखील समावेश आहे.
-------------
६५८ मिळकतींवर जप्तीची कारवाई
मिळकती सील व जप्त करण्याच्या कारवाईला वेग मिळकत कर थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट फार मोठे असल्याने ते पूर्ण करण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाकडून विशेष मिळकत कर वसुली पथक स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक परिमंडळ कार्यालयासाठी स्वतंत्र पथक देण्यात आले आहे. याशिवाय विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक यांना मिळकत थकबाकी वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आता पर्यंत ६५८ मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पंधरा दिवसांत या कारवाईमुळे २५ कोटींची कर जमा झाला आहे.