Pune: जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी लाच घेणारा महसुल सहायक जाळ्यात
By विवेक भुसे | Published: January 31, 2024 05:03 PM2024-01-31T17:03:30+5:302024-01-31T17:03:52+5:30
तक्रारदार यांना या बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी घर जप्तीचे आदेश तहसिलदार कार्यालयामार्फत काढण्यात आले होते....
पुणे : गृहकर्जाबाबतची घरजप्तीची मुदत वाढवून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महसुल सहायकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. माधव राजाराम रेषेवाड (वय ५४) असे या महसुल सहायकाचे नाव आहे. माधव रेषेवाड हा सध्या दौंड तालुक्याच्या तहसिल कार्यालयात नेमणूकीवर होता. तक्रार यांनी २०१९ मध्ये ज्ञानदिप सोसायटी यांचेकडून त्यांचे घर तारण ठेवून कर्ज घेतले होते. तक्रारदार यांना या बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी घर जप्तीचे आदेश तहसिलदार कार्यालयामार्फत काढण्यात आले होते.
तक्रारदार यांनी ज्ञानदिप सोसायटीमध्ये वन टाईम सेटलमेंट करण्यासाठी ५ टक्के रक्कम भरली आहे. तसे पत्र तहसिलदार कार्यालयात दिले होते. त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या घरजप्तीचे आदेशाची मुदत वाढविण्यासाठी दौंड तहसिल कार्यालयात गेले होते. तेथील महसुल सहायक माधव रेषेवाड याने तक्रारदार यांचेकडे जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
या तक्रारीची पडताळणी ९ व १० जानेवारी रोजी केली असताना रेषेवाड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दौंडमधील महेश सोसायटीच्या बाहेर रोडवर बुधवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना रेषेवाड याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विरनाथ माने, पोलिस शिपाई माने, तावरे,चव्हाण यांनी ही कारवाई केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ७८७५३३३३३३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.