HSC / 12th Exam: आता विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान हाेणार; गेल्या वर्षी ७ तर यावर्षी ३ चुका झाल्याने पालक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:12 AM2023-02-23T09:12:48+5:302023-02-23T09:12:55+5:30

राज्य मंडळाच्या विविध विभागीय मंडळांचे तज्ज्ञ शिक्षक मिळून एक अचूक प्रश्नपत्रिका तयार करू शकत नाहीत का,

Review of errors by State Board of Education Parents are angry because of 7 mistakes last year and 3 mistakes this year | HSC / 12th Exam: आता विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान हाेणार; गेल्या वर्षी ७ तर यावर्षी ३ चुका झाल्याने पालक संतप्त

HSC / 12th Exam: आता विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान हाेणार; गेल्या वर्षी ७ तर यावर्षी ३ चुका झाल्याने पालक संतप्त

googlenewsNext

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत याहीवर्षी चुका झाल्याचे समोर आल्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. इंग्रजी प्रश्नपत्रिकेत गेल्यावर्षी सात, तर यावर्षी तीन चुका झाल्याचे निदर्शनास आले. राज्य मंडळाच्या विविध विभागीय मंडळांचे तज्ज्ञ शिक्षक मिळून एक अचूक प्रश्नपत्रिका तयार करू शकत नाहीत का, असा सवाल पालक उपस्थित करीत असून, राज्य शिक्षण मंडळ लाखाे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आराेप केला आहे.

दहावीची परीक्षा न दिल्यामुळे विद्यार्थी पहिल्यांदाच बाेर्डाच्या परीक्षेला सामाेरे जात हाेते. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थी तणावात हाेते. त्यामध्ये प्रश्न विचारण्यातच चुका केल्याने अनेक जण संभ्रमात पडले. प्रश्न समजून घेण्यात अनेकांचा वेळ गेला. प्रश्न न समजल्याने असंख्य विद्यार्थ्यांनी हा प्रश्नच साेडून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान हाेणार आहे.

इंग्रजी विषयाच्या प्रश्न क्रमांक-३ अंतर्गत ए-३, ए-४ व ए-५ या प्रश्नांऐवजी ‘मॉडेल ॲन्सर’मधील ए-३ व ए-५ यात शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सूचना व ए-४ कृतीमध्ये माॅडेल ॲन्सरचे उत्तर छापण्यात आले. दरम्यान, प्रश्न चुकल्याचे निदर्शनास येताच शिक्षण मंडळास उपरती झाली असून, विद्यार्थ्यांना याेग्य ताे न्याय देण्यात येईल, असे मंडळाने जाहीर केले आहे.

गेल्या वर्षीही इंग्रजी प्रश्नपत्रिकेत झाल्या चुका

बारावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत गेल्यावर्षी २०२२ मध्येही सात चुका झाल्या हाेत्या. मंडळाने ठरवून दिलेल्या प्रारूपाच्या विपरीत पेपर आल्याने विद्यार्थी बुचकाळ्यात पडले हाेते. प्रश्न क्रमांक १ मध्ये दाेन सेंटेन्स सिम्पल करायचे हाेते. त्यात पहिला प्रश्न सिम्पल देऊन ताेच सिम्पल करा, असे सांगितले हाेते. प्रश्न क्रमांक ४ मध्ये मुलाखतीच्या प्रश्नासाठी टेबल आवश्यक असताना ताे दिला नव्हता. कवितेवरील काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या आकलनाबाहेरचे हाेते, तर प्रश्न ४ मध्ये अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकल्या नव्हत्या.

संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना याेग्य ताे न्याय देण्यात येईल

इंग्रजी विषयासाठी विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांची संयुक्त बैठक आयाेजित केली हाेती; पण शिक्षकांच्या बहिष्कारामुळे ती हाेऊ शकली नाही. इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत मुख्य नियमकांची संयुक्त सभा आयाेजित केली आहे. त्या संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना याेग्य ताे न्याय देण्यात येईल. -अनुराधा ओक, सचिव, शिक्षण मंडळ

ही तर मंडळाच्या अधिकाऱ्यांची चूक -  मनविसे

प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुका या छपाई विभागाच्या नसून, अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्या आहेत. प्रश्नपत्रिकांचे प्रूफ तपासणीकडे अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे दाेषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना सरसकट सहा गुण द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली. सचिव अनुराधा ओक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी राज्य संघटक प्रशांत कनाेजिया, सचिव आशिष साबळे, सदस्य रूपेश घोलप, सारंग सराफ, पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, ॲड. सचिन ननावरे, सागर कुलकर्णी, केतन डोंगरे, आशुतोष माने, नीलेश जोरी उपस्थित होते.

Web Title: Review of errors by State Board of Education Parents are angry because of 7 mistakes last year and 3 mistakes this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.