आधार कार्डसंदर्भात प्रशासनाकडून कामाचा आढावा; महाआॅनलाइनच्या २७ आॅपरेटर्सना टाकले काळ्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:04 AM2017-11-04T05:04:13+5:302017-11-04T05:04:16+5:30
आधार कार्डसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणी महाआॅनलाइन कंपनीमुळे येत असून, या कंपनीच्या २७ आॅपरेटर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तब्बल ५४ मशीन्स नादुरुस्त झालेल्या आहेत.
पुणे : आधार कार्डसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणी महाआॅनलाइन कंपनीमुळे येत असून, या कंपनीच्या २७ आॅपरेटर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तब्बल ५४ मशीन्स नादुरुस्त झालेल्या आहेत. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी या मशीन्स दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात यावी तसेच खासगी कंपन्यांच्या १00 आॅपरेटर्सना शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रणाखाली काम करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीच्या कामांसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आधार कार्डच्या कामाचा आढावा घेतला. केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महाआॅनलाइनच्या संथ कामामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, यापूर्वी आधार नोंदणीचे काम केलेल्या चार कंपन्यांच्या १00 आॅपरेटर्सने शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्यास तयार असल्याने लेखी स्वरूपात दिले आहे. या आॅपरेटर्सना काम करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून, यावर सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता असल्याचे राव यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडे एकूण २७0 मशीन्स आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सद्यस्थितीत ९६ केंद्रे सुरू असून, यातील ५२ केंद्रे पुणे शहरात सुरु आहेत. तर ५४ मशीन्स नादुरुस्त आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने वार्षिक देखभाल करार न केल्याने मशीन्सच्या देखभाली प्रश्न निर्माण झाला आहे.
...तर त्यांनाही काळ्या यादीत टाकणार
खासगी कंपन्यांच्या आॅपरेटर्सची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी जर गैरवर्तणूक केली, भ्रष्टाचार केला, तर त्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात येणार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
खासदार अनिल शिरोळे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन अधिकाºयांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी आधार कार्डला येत असलेल्या अडचणी आणि कामाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील बंद असलेल्या मशीन्स दुरुस्त करण्यास परवानगी मिळाल्यास जिल्हा नियोजन समिती अथवा सेतूमधून खर्चाची तरतूद करता येणार आहे. मावळ व खेडमधील मशीन्स कमी करून पुणे शहराला आणखी २0 मशीन्स देण्यात येणार आहेत. पुण्यात १२५ मशीन्स लागणे अपेक्षित आहे. उर्वरित ५0 मशीन्सचा तुटवडा पुढील दहा ते पंधरा दिवसांत दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.