गुगलवर मॅपवर रिव्ह्यू देण्याचे काम; युवकाला तीन लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: February 28, 2024 04:09 PM2024-02-28T16:09:21+5:302024-02-28T16:10:22+5:30
पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला २०३ रुपये मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला
पुणे : गुगलवर मॅपवर रिव्ह्यू देण्याचे काम आहे, काम पूर्ण केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगून युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या योगेश राजशेखर बटगेरी (३८) यांनी सिंहगडरोड पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, हा प्रकार १० डिसेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. आश्वी सिंग नावाची एचआर बोलत असल्याचे सांगून गुगलवर रिव्ह्यू देण्याचे काम करा त्याबदल्यात पैसे मिळविता येतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर सुरुवातीला २०३ रुपये मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी पैसे मिळू शकतात, असे आमिष दाखवून तक्रारदार यांना प्रीपेड टास्क करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे बटगेरी यांनी प्रीपेड टास्क करण्यास सुरुवात केली. वेगवेगळी कारणे देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. एकूण ३ लाख ७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. काही कालावधीनंतर पैसे भरूनही मोबदला देण्याचे बंद केल्याने तक्रारदार यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.