सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:09+5:302021-04-13T04:10:09+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. तसेच राज्य मंडळाकडून लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. या निर्णयाचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परीक्षेच्या नियोजनासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली. त्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची निर्णय घेतला. त्यामुळे या परीक्षा आता मे-जून महिन्यात होणार आहेत.
विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पाठवण्याबाबत पालकांच्या मनात भीतीचे वातावरण होते. तसेच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
--
शासन नियमानुसार दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच राज्य मंडळातर्फे परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
--
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर जाताना दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असत्या. तसेच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली असती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शासनाने परीक्षा पुढे ढकलल्या. या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.
- दत्तात्रय पवार, पालक
---
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे होते. आता विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासाठी वेळ मिळाणार आहे. कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने एका दिवसात दोन-तीन विषयांच्या परीक्षा घ्याव्यात.
- मिलिंद शिंदे, पालक