‘उजळणी’ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवज : डॉ. सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:00+5:302021-01-21T04:12:00+5:30
पुणे : ‘उजळणी’ हे एक वेगळ्या धाटणीचे आत्मचरित्र असले तरी ते केवळ व्यक्तीचरित्र नाही तर यात महाराष्ट्राचा इतिहासही सामावलेला ...
पुणे : ‘उजळणी’ हे एक वेगळ्या धाटणीचे आत्मचरित्र असले तरी ते केवळ व्यक्तीचरित्र नाही तर यात महाराष्ट्राचा इतिहासही सामावलेला आहे. एका अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘गुंफिरा’ कथासंग्रह आणि ‘उजळणी’ या आत्मचरित्रपर ललित लेखन अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी प्राध्यापिका रूपाली शिंदे, प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी आदी उपस्थित होते. रोहन प्रकाशनाच्या संपादिका नीता कुलकर्णी यांनी ‘गुंफिरा’ पुस्तकातील एका कथेचे वाचन केले.
डॉ. मोरे म्हणाले, डॉ. माधवी वैद्य यांच्या जगण्यात एक नजाकत तितकाच ठामपणा आहे. ‘ठामपणा’ हा फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हे. यामध्ये महिलांच्या जगण्याचे आणि उजळण्याचे सार्थक आहे. आजच्या काळात लोकांना संस्थाने काय आहे हे माहिती नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पटवर्धन कुटुंबाचे महत्त्व मोठे आहे. हाच कुटुंबाचा वारसा डॉ. वैद्य यांना लाभला. त्यांच्या 'उजळणी' या आत्मचरित्रात महाराष्ट्राचा भाग दिसतो. पुण्याचा इतिहास लिहिताना डॉ. वैद्य यांचे नाव आवर्जून घेतले जाईल.
मनीषा साठे म्हणाले, गुंफिरा म्हणजे गुंता. हाच गुंता एक एक धागा घेऊन सकारात्मकपणे सोडविला तर तो नक्कीच सुटतो. या पुस्तकात त्यांनी अनेक विषयांची बांधणी केली आहे. आयुष्यात आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यातले प्रसंग, व्यक्तिरेखा आणि संवाद प्रकर्षाने मनाला भिडले.
डॉ. माधवी वैद्य यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका मांडली. ‘गुंफिरा’ हे पुस्तक मैत्रिणीच्या स्मृतीला समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रुपाली शिंदे यांनी दोन्ही पुस्तकांबद्दल मनोगत व्यक्त केले. बीणा जोशी यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.