गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'कीर्तन'परंपरेला नव संजीवनी; वैविध्यपूर्ण कीर्तनांची रसिकांना मिळणार पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:52+5:302021-04-14T04:11:52+5:30
दीपक कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याला कीर्तन परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. पूर्वीच्या काळी समाजप्रबोधनासाठी देखील थोर ...
दीपक कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्याला कीर्तन परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. पूर्वीच्या काळी समाजप्रबोधनासाठी देखील थोर संत महात्म्यांनी, समाजसुधारकांनी कीर्तनसेवेचा आधार घेतलेला देखील दिसून येते. मात्र, काळाच्या ओघात मनोरंजन, प्रबोधनाची साधने बदलत गेली आणि ही कीर्तन परंपरा आज कुठेतरी लुप्तप्राय अवस्थेत आहे. मात्र, आता पुन्हा जय जय राम कृष्णहरी, नानाविध अभंग, यांचे स्वर कानावर पडणार आहे. कीर्तन परंपंरेला नवी संजीवनी देण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'कीर्तनविश्व' हे यू-ट्यूब चॅनेल सुरू होत आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कीर्तन क्षेत्रातील वेगवेगळ्या परंपरा, कीर्तनकारांची ओळख होणार आहे.
विश्व मराठी परिषद आणि भीष्म इंडिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तन विश्व हे यू-ट्यूब चॅनेल गुढी पाडव्याला सुरू होणार आहे. या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला तीन कीर्तने सादर केली जाणार आहे. यात नारदीय, रामदासी, एकनाथी,वारकरी, राष्ट्रीय, वैज्ञानिक कीर्तने
तुकडोजी महाराज, दासगणू महाराज, गाडगे महाराजांच्या पठडीतले कीर्तन असणार आहे. नवीन पिढीला थोर कीर्तन परंपरेची ओळख तसेच बुजुर्ग लोकांना पुन्हा कीर्तनांचा आनंद मिळणार आहे. या कीर्तनांद्वारे ऐतिहासिक, स्वातंत्र्य संग्रामातील शौर्यगाथा, महापुरुषांच्या कथा, शास्रज्ञ, संतांच्या कथांचा खजिना उलगडला जाणार आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले की, आपल्याला कीर्तनसेवेची मोठी परंपरा आहे.आणि या कीर्तनांचे वेगळेपण म्हणजे त्यांनी सातत्याने मनोरंजनातून समाज प्रबोधनाची भूमिका निभावली आहे. आजची जीवनशैली प्रचंड धकाधकीची आहे आणि त्यात सध्याच्या घडीला कोरोना संकटाने तर अवघ्या विश्वात प्रचंड दुःख, भीती, नैराश्य निर्माण झाले आहेत. मात्र या कीर्तनांच्या माध्यमातून ती निराशा दूर होऊन आत्मविश्वास प्रेरणा,धारिष्ट्य, शक्ती, सकारात्मकता यांच्या जोरावर कोरोनाविरुद्धची लढाईत बळ मिळेल अशी आशा आहे. तसेच बौद्धिक, भावनिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक सांगीतिक, नैतिक आनंद मिळणार आहे.
....
कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना अनेक मर्यादा आल्या आहेत. त्यातून ऑनलाईन व्यासपीठाचा पर्याय समोर आला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. म्हणून पुढील वर्षभर ऑनलाईन व्यासपीठावर सुरु राहील असा एखादा उपक्रम राबवयाचा होता. आणि तो एकाच माणसाने सादर करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कीर्तनाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना घेऊन करावा असे वाटले. आणि त्याच अनुषंगाने हा उपक्रम सुरु केला आहे. सध्या ५२ आठवड्यांचे १५३ कीर्तने तयार आहे. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार.