प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:19+5:302021-04-23T04:11:19+5:30

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी ...

Revolutionaries of the provinces | प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक

Next

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी झाल्यानंतरही इंग्रजांशी उघड लढा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेप्रमाणे काही धनिक लोकही काम करू लागले. पुण्यातले नारो बल्लाळ डावरे यांचे पेशवाईतील वतन इंग्रजांनी बंद केले. त्यांचा थोरला मुलगा गोविंद यांचा जन्म १७ डिसेंबर १८३६ मध्ये तर, माधव यांचा जन्म १८४१ मध्ये झाला. धाकट्या बळवंतचा जन्म १८४७ मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. भवानी पेठेत या तिघा भावांनी स्वतः ची व्यायामशाळा बांधली. अनेक तरुणांना व्यायामाची गोडी लावली. थोरला मुलगा गोविंदरावांची आठ घरे, एक बाग, तसेच अनेक ठिकाणी जमिनी होत्या. स्वतःची व्हिक्टोरिया गाडी, घोडे-गाई-म्हशी आदी जनावरेही होती. व्यापारासाठी स्वतःची पेढीही होती. त्यातून ते अनेकांना गुप्तपणे क्रांतिकार्यासाठी मदत करत होते. इंग्रजांचा त्यांच्यावर संशय होता. १८६७ मध्ये त्यांच्यावर खटलाही भरला. पण त्या खटल्यातही ते निर्दोष सुटले. मग सरकारने बळवंतराव व माधवराव यांच्यावर खटला भरून त्यांना १८७४ मध्ये अंदमानच्या तुरुंगात पाठवले. तरीही गोविंदरावांनी गुप्तपणे क्रांतिकार्याला मदत करणे चालूच ठेवले. वासुदेव बळवंत फडके यांनाही त्यांनी मदत केल्याचा इंग्रजांना संशय होता. बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड या राजावर इंग्रजांनी खटला भरला होता. त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावेळीही उघडपणे सार्वजनिक काका व गुप्तपणे गोविंदराव डावरे यांनी पुढाकार घेऊन मोठा निधी उभा केला होता. उघडपणे गोविंदरावांवर कोणतेच आरोप ठेवता येत नसल्यामुळे चौकशीसाठी १८७९ मध्ये पुण्यातील सध्याच्या मामलेदार कचेरीच्या तुरुंगात कच्च्या कैदेत ठेवले. त्यावेळी कोठडीतील रॉकेलच्या चिमणीतील तेलाच्या साहाय्याने त्यांनी स्वत:ला जाळून घेतले, असे इंग्रजांनी दाखवले. परंतु कोठडीत अशा काही दिव्याची परवानगी नसल्याने इंग्रजांनीच त्यांना १३ डिसेंबर१८७९ या दिवशी अमानुषपणे जाळून मारले होते.

१८९७-९८ या काळात एकाच कुटुंबातील दामोदर-बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर हे तिघे बंधू फासावर गेल्याचे आपल्याला माहिती आहेच. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे थोरले बंधू गणेश ऊर्फ बाबाराव हे दोघे अंदमान येथे तर, डॉ. नारायणराव या सावरकरांच्या धाकट्या भावाने तुरुंगवास भोगला. त्यांच्या २० वर्षे आधी हुतात्मा गोविंदराव व अंदमानात शिक्षा भोगणारे माधवराव, बळवंतराव अशा तीन सख्ख्या भावांचेही स्वातंत्र्यलढ्यातील कार्य आपण लक्षात ठेवले पाहिजे.

--

फोटो : क्रांतिकारक हुतात्मा डावरे

Web Title: Revolutionaries of the provinces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.