पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जावेत
By Admin | Published: March 8, 2016 01:22 AM2016-03-08T01:22:02+5:302016-03-08T01:22:02+5:30
एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही.
पुणे : एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही. साहित्यविषयक पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जाण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा बुक गॅलरीने पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र दालन केले आहे. या दालनाचा शुभारंभ श्याम मनोहर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी मुक्तसंवाद साधला.
मनोहर म्हणाले, की लेखकांना पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख होत नाही, तर फक्त राजकारण झाल्याचे सांगून टीका करावीशी वाटते. पण, एखाद्याला पुरस्कार मिळाल्यावर या भावना, टीका दिसत नाहीत. वाचकांना सोबत घेऊन पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ‘लोक सर्वेक्षण’ करता आल्यास ग्रंथांची गुणवत्ता, वाचकांचे अभिप्राय समजून घेणे शक्य होईल. यातून लेखकाला आपल्या लिखाणातल्या उणिवा लक्षात येतील.
लेखक या नात्याने पोषक आणि अनुकूल वातावरण सध्या आपल्याकडे नसल्याचे सांगून मनोहर म्हणाले, की सध्याच्या वातावरणात माणूस कुटुबांत, समाजात, मित्रमंडळींमध्ये काय आहे? समाजाचं, जगण्याचं, भाषेचं मोल त्याच्या आयुष्यात काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून, भारतीय म्हणून त्याचं काय संचित आहे, ही इतकी उतरंड माझ्या मनात कायम असते. त्या अंगाने मी कथा, कादंबऱ्यांचे लिखाण करीत असतो. समाजाचं ज्ञानक्षेत्र आपल्याकडे अजून विकास पावत नाहीय,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)