सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे पडघम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:49+5:302021-09-14T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या कोरोनामुळे लांबलेल्या निवडणूक प्रक्रियेस अखेर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानेच त्यांच्या अधिकारात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या कोरोनामुळे लांबलेल्या निवडणूक प्रक्रियेस अखेर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानेच त्यांच्या अधिकारात सुरुवात केली. ३१ ऑगस्टला स्थगिती आदेशाची मुदत संपल्यानंतर सरकारने अजून काहीच निर्णय न घेतल्याने प्राधिकरणाने हा निर्णय घेतला.
पहिल्या टप्प्यातील ३ हजार ८०० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया यामुळे आता सुरू झाली आहे. कोरोनाच्या लाटेत सरकारने या संस्थांच्या निवडणुकांना मागील दोन वर्षांत पाचवेळा स्थगिती दिली. त्यामुळे पंचवार्षिक मुदत संपूनही निवडणूक झाली नाही अशा संस्थांची संख्या आता ६५ हजार झाली आहे. गृहनिर्माण संस्थांसह सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचा यात समावेश आहे.
प्राधिकरणाने सदस्य संख्या, मुदत पूर्ण होऊन झालेला कालावधी अशा काही निकषांवर या संस्थांचे सहा टप्पे केले आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यातील ३ हजार ८०० संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सांगितले. अन्य संस्थांबाबत स्वतंत्रपणे आदेश काढले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.