भाताचे आगर पावसाच्या प्रतीक्षेत!

By admin | Published: June 15, 2016 04:51 AM2016-06-15T04:51:51+5:302016-06-15T04:51:51+5:30

रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत.

Rice awaiting rain! | भाताचे आगर पावसाच्या प्रतीक्षेत!

भाताचे आगर पावसाच्या प्रतीक्षेत!

Next

डिंभे : रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेमुळे अजूनही निम्म्या अर्ध्या भातपेरण्या रखडल्या असून, जमिनीतील उष्णता वाढू लागल्याने पेरलेली भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरू झाली आहे. भातरोपांना पाटाचे पाणी देऊन रोपे वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. या भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती केली जाते. भातशेती हीच या शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे.
दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेल, या आशेवर धूळवाफेवर भातपिकाची पेरणी करतात. या नक्षत्रात पाऊस झाल्यास रोहिणीची वाफ लागली. यंदा भातपीक चांगले येणार असा शेतकऱ्यांमध्ये संकेत आहे. यालाच रोहिणीची वाफ म्हणतात. रोहिणी नक्षत्राची वाफ लागल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठीही वेळेत होतात. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेलच या आशेवर जुने जाणते शेतकरी भातपिकाच्या पेरण्या करताना पाहावयास मिळतात.
मात्र, यंदा रोहिणी नक्षत्र सरून मृगाचेही पाच ते सहा दिवस सरले तरी आकाशात ढगांचा ठिपूस दिसत नाही. रोहिणीत नाही तरी मृग नक्षत्र सुरू होताच पावसाला सुरुवात होईल या आशेवर काही शेतकऱ्यांनी रोहिणी सरताच धूळवाफेवर भातपेरण्या केल्या आहेत. मात्र, मृग नक्षत्रानेही पाठ फिरवल्याने झालेल्या भातपेरण्या संकटात सापडल्या आहेत. उगवून आलेल्या रोपांचे कोंब सुकू लागले असून, जमिनीतील दाणे कोठण्याची वेळ आली आहे. यामुळे ही रोपे पाटाचे पाणी, टँकरने पाणी देऊन वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे.

पावसाची प्रामुख्याने भात उत्पादक शेतकरी आतुरतेने वाट पाहतोय. जर आणखी आठ दिवस पाऊस लांबला तर धुळवाफेवर केलेली पेरणी वाया जावू शकते. कृषी विभागाने भात बियानाची सुमारे ८0 टक्के विक्र्री आतापर्र्यत केली आहे.
- सुनील खैैरनार,
कृषी अधिकारी,
जिल्हा परिषद

Web Title: Rice awaiting rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.