रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: September 1, 2016 01:27 AM2016-09-01T01:27:59+5:302016-09-01T01:27:59+5:30
विविध मागण्यासांठी महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय रिक्षा बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पिंपरी : विविध मागण्यासांठी महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय रिक्षा बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई-पुणे महामार्ग वगळता शहरातील सर्व रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसल्या. महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात निर्दशने करण्यात आली. काही रिक्षाचालक लपूनछपून प्रवाशी वाहतूक करीत असताना बंदमध्ये सहभागी झालेल्या रिक्षाचालकांकडून त्यांना थांबवून प्रवाशी रिक्षातून उतरवून रिक्षाचालकांना दमदाटी करण्यात येत होती़ अनेक परिसरात प्रवाशी आणि रिक्षाचालकांच्या वाहतुकीमुळे संघटनेत बाचाबाची झाल्याचे आढळून आले़
आॅटो रिक्षाचालक -मालक संघटना कृती समितीने मागण्यांसाठी एकदिवसीय रिक्षा बंद पुकारला होता. प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर बंदी आणावी, रिक्षाचालक - मालकासांठी कल्याण मंडळ स्थापन करावे, बेकायदा वाहतूक बंद करावी, या प्रमुख मागण्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीमधील रिक्षाचालकांनी व्यवसाय बंद ठेवून सकाळी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली. रिक्षाचालक-मालकासांठी कल्याण मंडळ स्थापन करा, अशा घोषणा दिल्या. दत्ता भोसले, गोकुळ रावळकर, गंगाराम माने, सुदाम बनसोडे, नवनाथ टेडे, दिलीप साळवे, महेश कांबळे, सदाशिव नळेकर आदी उपस्थित होेते.
सकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील काही रिक्षाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतलेला दिसून आला. तर निगडी-प्राधिकरण, भोसरी, काळेवाडी, थेरगाव, वाकड या भागामध्ये मात्र बहुतांश रिक्षा रस्त्यावर धावताना दिसून आल्या. काही ठिकाणी मात्र थांब्यावर रिक्षा उभ्या न करता दुसरीकडे रिक्षा उभ्या करून संपात सहभागी असल्याचे रिक्षाचालकांनी दाखविले.
तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीएल प्रशासनातर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, शहरातील परिस्थिती पाहता जादा बसेस सोडण्याची गरज पडली नाही. नेहमीप्रमाणे सर्व मार्गांवरील बसेस वेळेवर सोडण्यात येत होत्या, अशी माहिती पीएमपीएलच्या पिंपरी, भोसरी, निगडी येथील आगार व्यवस्थापकांनी दिली.
शहरातील प्रवाशी वाहतूक करण्यासाठी असलेल्या अनेक पीएमपी गाड्या वेळेवर नसल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला़ रिक्षाचालकांचा संप आणि पीएमपी बसची कमतरता यामुळे प्रवासाचा खोळंबा झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली़
काही भागांत सायंकाळच्या वेळेत रिक्षाचालकांनी प्रवाशी वाहतूक केली. रिक्षाचालकांच्या संपामुळे रुग्णालयातील उपचार घेऊन घरी निघालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसह अनेकांना रिक्षा मिळत नसल्यामुळे रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागले़ सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी नियमित येणाऱ्या काही रिक्षाचालकांनी दांडी मारल्याने पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी जावे लागले़ तर गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी गावाला निघालेल्या अनेक नागरिकांना रिक्षा न मिळाल्याने रेल्वे स्थानकावर आणि बस स्थानकावर पोहचण्यास उशीर झाला़ रिक्षाचालकांचा धंदा परदेशातील खासगी कंपन्यानी सुरू केल्याने
आम्ही जगायचे कसे, नियमांची पायमल्ली इतर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडून होत असताना प्रत्येक वेळी रिक्षाचालकांना लक्ष्य केले जात आहे़ (प्रतिनिधी)
पीएमपीएल हाऊसफुल्ल
१उद्योगनगरीत रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, पुण्यात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे पीएमपीएल बसेसला सकाळपासून प्रचंड गर्दी होती. पीएमपीएलच्या स्वारगेट डेपोला तर यात्रेचे स्वरूप आले होते. सर्व मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. निगडी, पिंपरी, भोसरी येथील पीएमपीएल डेपोच्या बसेसला पुण्याकडे जाताना प्रवाशांची अल्प प्रमाणात गर्दी होती. मात्र, पुण्याहून येताना या सर्व बसेस गर्दीने भरून येत होत्या. विशेष म्हणजे पुणे मनपा ते निगडी, पुणे स्टेशन ते चिंचवडगाव, पुणे मनपा ते कात्रज, डेक्कन ते निगडी या बसेसला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती.
२पुण्याकडून येणाऱ्या सर्व बसेसला गर्दी असल्यामुळे पिंपरी आणि निगडी डेपोतर्फे पुण्यासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील रिक्षा संपावर असल्यामुळे बसेसचा आधार
घ्यावा लागला. बसमधील गर्दीमध्ये विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले. संपामुळे सायंकाळच्या
सुमारास प्रवाशांची गर्दी अधिक वाढल्याने चाकरमान्यांची बस पकडण्यासाठी चांगलीच धावपळ होताना दिसून आली. रात्री उशिरापर्यंत पुण्याहून पिंपरीकडे येणाऱ्या सर्व बसेस हाऊसफुल्लच येत असल्याचे दिसून आले.