रिक्षाचालकांच्या मदतीची लिंक अखेर तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:30+5:302021-05-23T04:09:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना निर्बंधातील मदत म्हणून रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी लागणारी लिंक अखेर परिवहन विभागाने तयार केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोना निर्बंधातील मदत म्हणून रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी लागणारी लिंक अखेर परिवहन विभागाने तयार केली आहे. या लिंकवर जाऊन परवाना क्रमाकांसह आधार कार्ड, बँक खाते क्रमांक तपशील दिला की दीड हजार रुपये बँकेत जमा होतील.
सरकारी मदत जाहीर होऊन महिना झाला तरी रिक्षाचालकांना पैसे मिळत नव्हते. सरकारने अशीच मदत जाहीर केलेल्या फेरीवाला, घरेलू कामगार, इमारत बांधकाम मजूर यांच्या खात्यात पैसे जमा झाले तरी रिक्षाचालक मात्र उपेक्षितच राहिला होता. आता परिवहन आयुक्तालयाने लिंक तयार केल्याने ही मदत मिळू शकणार आहे. ही लिंक राज्यातील सर्व परिवहन विभागांना पाठवण्यात येणार असून सर्व रिक्षाचालकांसाठी ती खुली असेल. त्यावर जाऊन रिक्षाचालकाने स्वत:चा तपशील द्यायचा आहे की, त्याची छाननी होऊन पैसे संबधिताच्या बँक खात्यात जमा होतील.
सरकारी नियमाप्रमाणे मदत थेट बँक खात्यात जमा करायची होती; पण एकाही रिक्षाचालकाच्या बँक खात्याचा तपशील परिवहन विभागाकडे नव्हता. त्यामुळेच त्यांना मदत द्यायची कशी असा गहन प्रश्न परिवहन विभागासमोर होता. दरम्यान सरकारने रिक्षाचालकांना द्यावे लागणारे पैसे एका खासगी बँकेत जमा केले. त्या बँकेने परिवहन विभागाकडे विचारणा केल्यानंतर सूत्रे हलली व आता बँकेच्या तसेच सरकारी तंत्रज्ञांच्या साह्याने एक लिंक तयार करण्यात आली आहे.
चौकट
“आम्हाला लिंक मिळाली की ती सर्व रिक्षाचालकांनाही कळवण्यात येईल. परवाना क्रमांकांची नावाची छाननी केली जाईल. वरिष्ठ कार्यालयाकडून यासंबंधात येणाऱ्या सूचनांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.”
-अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
चौकट
“रिक्षा चालकांच्या नावावर कर्ज असते. खात्यात पैसे जमा झाले की बँक कर्जाच्या थकीत व्याजापोटी ते वर्ग करून घेतील. त्यामुळे रिक्षाचालकांंनी कर्ज नसलेले बँक खाते आधार कार्डशी जोडून घ्यावे व तोच खाते क्रमांक लिंकवर द्यावा.”
-आप रिक्षा संघटना