प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणारा रिक्षाचालक जेरबंद; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:40 AM2023-06-09T10:40:52+5:302023-06-09T10:41:20+5:30
रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी विशेष पथक...
पुणे : बेकायदेशीरपणे रिक्षाचालक म्हणून काम करता प्रवाशावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करून दाताने कानाचा लचका तोडणाऱ्या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सदस्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आदेश संजय काळे (वय ३९, रा. पर्वती दर्शन) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध ३ खुनाचे व इतर चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.
फिर्यादी हे १ जून रोजी अलिबागला जाण्यासाठी रिक्षाने स्वारगेटला आले होते. भाड्यावरून त्यांचा रिक्षाचालक आदेश याच्याबरोबर वाद झाला. तेव्हा त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी प्रवाशाला मारहाण केली. आदेश याने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांनी तो वार चुकविल्यावर त्यांच्या कानाचा लचका तोडला होता. स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
आदेश काळे हा बारामती येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस बारामतीला पोहचले. परंतु, तो पुण्याला गेल्याचे तेथे समजले. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट बसस्थानकाजवळ त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी निरीक्षक अशोक इंदलकर, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले कर्मचारी मुकुंद तारू, शिवा गायकवाड, संदीप घुले, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.
रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी विशेष पथक
रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे रिक्षा चालवून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात स्वारगेट पोलिसांनी ८ रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. स्वारगेट तसेच पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी बसस्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांची तेथे मोठी वर्दळ असते. रात्रीअपरात्री बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांकडून अवास्तव भाडे वसूल करणे, प्रसंगी त्यांना मारहाण करणे अशी कृत्ये सातत्याने होताना दिसतात.