रिफ्लेक्टर सक्तीच्या निषेधार्थ रिक्षाचालकाचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:25+5:302021-06-22T04:09:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे लावण्यात येणारे रिफ्लेक्टर रिक्षांनादेखील अनिवार्य करण्यात आले. शिवाय यासाठी नामनिर्देशित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे लावण्यात येणारे रिफ्लेक्टर रिक्षांनादेखील अनिवार्य करण्यात आले. शिवाय यासाठी नामनिर्देशित कंपन्याचेच रिफ्लेक्टर लावणे हे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे त्याचे वाढलेले दर, रिक्षासाठी २ मीटर टेप ठीक असताना क्यूआर कोडसाठी त्यांना १० मीटरचीच खरेदी विनाकारण करावी लागत आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने सोमवारी आरटीओ कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले.
रिफ्लेक्टर रिक्षांना सक्तीचे करण्यात आल्याने रिक्षाचालकांमध्ये रोष निर्माण झाला. या वेळी
प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आक्रमक झालेल्या रिक्षाचालकांनी अजित शिंदे यांची बनियनवर येऊ नका ही विनंती धुडकावत निवेदन दिले.
यावेळी आम आदमी संघटनेचे सचिव आनंद अंकुश म्हणाले ,
रिफ्लेक्टर खरेदी केल्यानंतर हा क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र विक्रेत्याने वाहनाच्या मालकाला द्यायचे आहे. रिफ्लेक्टर लावलेले नसतील व प्रमाणपत्र नसेल तर त्या वाहनाचे पासिंग होणार नाही. पूर्वी यासाठी केवळ १०० रुपये लागायचे. आता त्यासाठी १ हजार मोजावे लागत आहे.
५० एमएम रूंदीचा टेपही रिक्षाचा आकार लक्षात घेता जास्तच होतो. तरीही त्याची खरेदी करावीच लागते. त्याशिवाय रिक्षा पासिंग होणार नाही.
कोरोनामुळे सहा महिने रिक्षा बंद होत्या. आता सुरू असल्या तरी व्यवसाय कमी झाला आहे. त्यात असली खर्चिक सक्ती झाल्याने रिक्षाचालक वैतागले असल्याचे ते म्हणाले.