रिक्षाचालकांनी आखल्यात हद्दीच्या रेषा
By admin | Published: December 1, 2015 03:35 AM2015-12-01T03:35:41+5:302015-12-01T03:35:41+5:30
एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या
पिंपरी : एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या रिक्षाचालकाला परिसरात थांबूही देत नाहीत. रिक्षावाले त्यांच्याच व्यवसायातील रिक्षाचालकांना सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यातील या हद्दीच्या वादामुळे आर्थिक भुर्दंडाचा फटका प्रवाशांना बसतो आहे.
पुणे शहरात रिक्षा चालविणारा एखादा रिक्षाचालक पिंपरी-चिंचवडमध्ये आला, तर त्याला परतीच्या प्रवासात विनाभाडे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याच ठिकाणी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशाला त्या रिक्षात बसू दिले जात नाही. त्यामुळे त्या रिक्षाचालकाला रिकामी रिक्षा नेणे भाग पडते. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकावर बेतते. पुण्याहून येताना-जाताना परतीचे भाडे मिळणार नाही, हे गृहीत धरून प्रवाशांना भरमसाट भाडे आकारले जाते. रिक्षावाल्यांच्या हद्दीच्या धोरणामुळे प्रवाशांना जादा भाडे देण्याचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यात जाणाऱ्या-येणाऱ्या रिक्षाचालकांची नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अंतर्गत भागातही अशीच स्थिती आहे. वल्लभनगरच्या रिक्षातळाजवळ थेरगावचा रिक्षावाला गेला, तर त्याला थेरगावचे प्रवासी भाडे घेता येत नाही. भोसरीतील रिक्षावाल्याला पिंपरीतून पिटाळून लावले जाते. रिक्षातळावर काही जण मालकी हक्क असल्याच्या आविर्भाव दाखवितात.
रिक्षा संघटना, रिक्षातळांवर थांबणारे रिक्षाचालक यांनी एकत्रित येऊन समन्वयाची भूमिका घेतल्यास समव्यावसायिक असलेल्या काही रिक्षाचालकांवर अन्याय होणार नाही. हद्दीच्या सीमारेषांची झळ त्यांना सोसावी लागणार नाही. विविध ठिकाणच्या प्रस्थापित रिक्षातळांच्या बाजूबाजूने व्यवसाय करणाऱ्यांनाही सामावून घेतल्यास त्यांच्यातील दरी कमी होईल. (प्रतिनिधी)
- नव्याने रिक्षा व्यवसायात येणाऱ्यांना तर रिक्षातळ मिळविणे जिकिरीचे होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा संघटना, वेगवेगळे नेते असल्याने त्यांना सामावून घेण्याच्या अडचणी येतात. रिक्षा संघटनांच्या नेत्यांशी ओळख नाही, त्यांना तर संघटनेचे सदस्य होण्यात अडचणी येतात.
शहरातील अनेक रिक्षाचालक कोणत्याही रिक्षातळावर न थांबता रात्रीच्या वेळी सर्वत्र फिरून व्यवसाय करतात. त्यांना तर कोणीच वाली नाही. पोटासाठी धडपड म्हणून ते रात्री जागून व्यवसाय करतात. दिवसा त्यांना थांबण्यासाठी रिक्षातळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनी फिरून व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.