पुण्यात रिक्षाचालकांचा रात्रीस खेळ चाले; रेल्वे, बसस्थानकावर प्रवाशांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:50 AM2022-08-08T11:50:22+5:302022-08-08T11:51:50+5:30

५० च्या ठिकाणी १५० रुपये...

Rickshaw drivers looted customer at night in pune city at railway, bus station | पुण्यात रिक्षाचालकांचा रात्रीस खेळ चाले; रेल्वे, बसस्थानकावर प्रवाशांची लूट

पुण्यात रिक्षाचालकांचा रात्रीस खेळ चाले; रेल्वे, बसस्थानकावर प्रवाशांची लूट

Next

पिंपरी : वेळ शनिवारी मध्यरात्री एकची. पुणे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला पिंपरीला येणार का, अशी विचारणा ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केली. तर, ६०० रुपये भाडे होईल, असे रिक्षाचालकाने सांगितले. मीटरने गेले तर साधारण २५० ते ३०० रुपये होतील, तर तुम्ही ६०० रुपये कशाचे सांगता, असा सवाल रिक्षाचालकाला केला असता रात्रीचे एवढ्या लांब येणे परवडत नसल्याचे कारण दिले. रात्रीचे दुप्पट, तिप्पट भाडे रिक्षाचालक आकारत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.

मध्यरात्री बसची सोय नाही किंवा इतर वाहन मिळणार नाही, या संधीचा फायदा घेत काही रिक्षाचालक ग्राहकांना लुटताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे आपल्याला गरज आहे, या दृष्टीने काही नागरिक हे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवासदेखील करतात.

५० च्या ठिकाणी १५० रुपये

दिवसा ज्या अंतरासाठी प्रवासी रिक्षातून प्रवास करताना ५० रुपये देतात, त्याच अंतरासाठी रात्रीच्या वेळी तब्बल तीनपट म्हणजे १५० रुपये प्रवाशाला मोजावे लागतात. याविषयी रिक्षाचालकाला विचारले असता त्याने सांगितले की, रात्रीच्या वेळी आम्ही भाडे दुप्पट आकारतो. शिवाय प्रवाशाला सोडल्यानंतर आम्हाला रिकामेच परत यावे लागते, त्यामुळे परत येण्याचे अर्धे भाडे आम्ही आकारत असतो.

कोठे काय आढळले?

रेल्वे स्थानक @ 1:00 am

पुणे रेल्वे स्थानकातून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येण्यासाठी साधारण २०० ते २५० रुपये भाडे आकारण्यात येते. मात्र, रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रिक्षा स्टँडवर शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चौकशी केली असता ५०० ते ६०० रुपये भाडे आकारण्यात येईल, असे रिक्षास्टँडवर थांबलेल्या रिक्षाचालकांनी सांगितले.

बस स्थानक @ 2: 00 am

स्वारगेट एसटी स्टँडजवळील रिक्षास्टँडवर पिंपरीतील आंबेडकर चौकात येण्यासाठी विचारणा केली असता ७०० रुपये लागतील, असे उत्तर रिक्षाचालकाने दिले. तर, अधिक चौकशी केली असता दुसरा रिक्षाचालक ६०० रुपयांमध्ये येण्यास तयार झाला. पीएमपी बसने स्वारगेट बस स्थानकातून पिंपरीत येण्यासाठी केवळ २५ रुपये तिकीट आहे. मात्र, रात्रीच्या वेळी जाण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने रिक्षाचालक तब्बल ५०० ते ७०० रुपये भाडे आकारत आहेत.

Web Title: Rickshaw drivers looted customer at night in pune city at railway, bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.