प्रवासी महिलेची बॅग जबरदस्तीने हिसकाविणारा रिक्षाचालक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 09:34 PM2021-07-27T21:34:56+5:302021-07-27T21:35:30+5:30
कोंढवा येथे राहणार्या एका ३५ वर्षाच्या महिलेने २१ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गोकुळनगर येथून रिक्षा केली होती.
पुणे : अव्वाच्या सव्वा रिक्षा भाडे सांगून महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेणार्या रिक्षाचालकाला तब्बल एक महिन्यानंतर पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट १ ला यश आले आहे.
राहुल प्रकाश भोडणे (वय २९, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे़ कोंढवा येथे राहणार्या एका ३५ वर्षाच्या महिलेने २१ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गोकुळनगर येथून रिक्षा केली होती. साधारण या अंतराचे ५० रुपये भाडे होत असतानाही राहुल भोडणे याने २०० रुपये भाडे मागितले. त्यावरुन वाद झाल्याने भोडणे याने या महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली होती. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यातील रिक्षाचालकाचा शोध घेतला जात होता. पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना हा रिक्षाचालक पहिले भाड्याचे घर सोडून टिळेकरनगर येथे दुसर्या भाड्याच्या घरात रहायला गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करुन भोडणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्यानंतर रिक्षा टिळेकरनगर येथे लपवून ठेवली होती.
पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी रिक्षा जप्त करुन आरोपीसह पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.