रिक्षाचालकांनाही मिळावे स्वस्त धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:37+5:302021-05-13T04:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना टाळेबंदीमुळे व्यवसाय पूर्ण कोलमडलेल्या रिक्षा व्यावसायिकांनाही स्वस्त धान्य योजनेत सामावून घेण्याची मागणी आप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना टाळेबंदीमुळे व्यवसाय पूर्ण कोलमडलेल्या रिक्षा व्यावसायिकांनाही स्वस्त धान्य योजनेत सामावून घेण्याची मागणी आप रिक्षा संघटनेने केली आहे.
सध्या शिधापत्रिकेवर वार्षिक ५९ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला २ रूपये किलो गहू व ३ रूपये किलो तांदूळ एका युनिटला मिळतात. रिक्षाचालकांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपेक्षा जास्त गृहीत धरल्याने त्यांना कायमच या योजनेच्या बाहेर ठेवले गेले.
कोरोनाच्या वर्षभराच्या कहराने राज्यातील दहा लाखांपेक्षा जास्त रिक्षाचालकांची अवस्था बिकट झाल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे. एका रिक्षाचालकाच्या हिशोबासह प्रातिनिधिक उदाहरण देऊन त्यांनी ते राज्य तसेच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाला सिद्धही करून दाखवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ७) घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीतही ‘आप’चे श्रीकांत आचार्य व अन्य पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. बैठकीस उपस्थित खासदार गिरीश बापट यांनीही यासंदर्भात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे आचार्य यांनी सांगितले.