सायकल चालवा, इंधन वाचेल, आरोग्य सुधारेल...फायदेच फायदे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:23+5:302021-06-03T04:08:23+5:30

पुणे : कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे यातून उभारी घेण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल हा ...

Ride a bicycle, save fuel, improve health ... Benefits! | सायकल चालवा, इंधन वाचेल, आरोग्य सुधारेल...फायदेच फायदे !

सायकल चालवा, इंधन वाचेल, आरोग्य सुधारेल...फायदेच फायदे !

Next

पुणे : कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे यातून उभारी घेण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल हा उपाय अतिशय उत्तम ठरू शकणार आहे. कारण, सायकल चालविल्यामुळे आरोग्य सुधारून प्रदूषण कमी होणार आहे. तसेच इंधनाचा खर्च वाचेल. एकूणच या कठीण परिस्थितीत सायकल प्रत्येकाला आधार देऊ शकते, अशा भावना सायकलपटूंनी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडी, हानिकारक प्रदूषण आणि वाढते अपघात हे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासाठी प्रशासन मोठे प्रशस्त रस्ते बांधते, उड्डाणपूल बांधते, पण त्यामुळे वाहनांची संख्या वाढतच जाते. परिणामी प्रदूषणही वाढते. त्यामुळे त्यावर रस्ते मोठे करणे, उड्डाणपूल बांधणे हा उपाय नाही, असे ‘परिसर’ संस्थेचे विश्वस्त सुजित पटवर्धन यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे सांगितले आहे.

——————————————

जवळ जायचे तर सायकलने जा

कामासाठी ये-जा करताना सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीची ठरते. दररोज २० मिनिटे सायकलिंग केल्याने मानसिक स्वास्थ सुधारते, वजन कमी होते, स्नायू बळकट होतात. फुफ्फुसे सक्षम होतात. हृदयाचे आजार वा कर्करोगाचा धोका कमी होतो. सुरक्षितपणे सायकली चालवता याव्यात यासाठी सायकल मार्ग तेही अडथळाविरहित हवेत.

———————————————-

परदेशात काय चाललंय ?

आज परदेशातील १ हजारहून अधिक शहरांमध्ये सायकल शेअरिंगच्या योजना चांगल्या प्रकारे सुरू आहेत. बोस्टन, न्यूयॉर्क, मॉस्को, बार्सेलोना, बुडापेस्ट हंग्री, मेक्सिको, सिडनी, बिजिंग, व्हिएन्ना आदी शहरांमध्ये ही योजना उत्तम सुरू आहे.

—————————————

आपल्या देशात काय चाललंय ?

विशाखापट्टणम या आंध्र प्रदेशातल्या किनारी शहरात २० किमी पर्यंतचे रस्त्यांचे पट्टे ‘नो मोटार व्हेईकल झोन’ बनवले आहेत. स्वत: महापालिका आयुक्तांपासून ते अनेक अधिकारी दर सोमवारी सायकलवरच कायार्लयात जातात. दक्षिणेतल्या बंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम, विजयवाडा या मोठ्या शहरांचा समावेश आहे.

—————————————

आरोग्यविषयक लाभ

नियमित सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि पर्यायाने फुफ्फुसे, हृदयाच्या आजारांच्या शक्यता फार कमी होतात. मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार सहज नियंत्रणात राहतात. कारण, यात पायापासून हृदयापर्यंत रक्ताचं वहन वाढतं आणि रक्तपुरवठा सुरळीत राहतो. सायकल चालवण्यामुळे भूक चांगली लागते आणि पचनसंस्था सुधारते.

————————————————

सायकल चालवून पैसे वाचतील

जवळच्या कामासाठी दुचाकी किंवा कारचा वापर न करता सायकलचा केला तर किती तरी इंधन वाचेल आणि नागरिकांचे पैसेही वाचतील. त्यामुळे देशाचा फायदा हाेणार आहे. सायकल प्रसार करण्यासाठी सायकलिंग अवेअरनेस पुणे ही संस्था सुरू केली. त्याद्वारे उपक्रम राबविले जात आहेत.

- सतेश नाझरे, सायकलिंग अवेअरनेस पुणे

——————————————————-

महापालिकेच्या सायकल शेअरिंगचे तीनतेरा

पुणे महापालिकेने सायकल शेअरिंग हा उपक्रम राबविला होता. पण अनेक समाजकंटकांनी त्या सायकली चोरून त्यांची मोडतोड केली. त्यामुळे ही योजना बारगळली. योग्य नियोजन, चांगले सायकल मार्ग तयार केले तर नक्कीच ही योजना यशस्वी होऊ शकते.

Web Title: Ride a bicycle, save fuel, improve health ... Benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.