पाण्याची पळवापळवी
By admin | Published: April 23, 2015 06:36 AM2015-04-23T06:36:00+5:302015-04-23T06:36:00+5:30
उन्हाची दाहकता वाढल्याने परिसरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा उठवत टॅँकर लॉबीचा धंदा जोमात सुरू असून, धंदा तेजीत चालण्यासाठी पाणीपुरवठ्याची त्यांनाच
अंकुश जगताप, पिंपरी
उन्हाची दाहकता वाढल्याने परिसरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा उठवत टॅँकर लॉबीचा धंदा जोमात सुरू असून, धंदा तेजीत चालण्यासाठी पाणीपुरवठ्याची त्यांनाच अधिक काळजी असल्याचा आव ते आणत आहेत. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती उभ्या करण्यासाठी महापालिकेच्या तसेच खासगी जलस्रोतांद्वारे बेसुमार पाणीवापर सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याने हे सर्व प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. पाऊस लांबल्यास शहराला पुन्हा पाणीटंचाईच्या खाईत लोटण्याचा कारभार पाणीपुरवठा विभागाकडून सध्या सुरू आहे.
शहराची लोकसंख्या १८ लाखांवर आहे. त्यातच नव्याने स्थलांतरित झालेल्यांचा विचार करता हेच प्रमाण २० लाखांवर आहे. अनेक जणांकडे अधिकृत नळजोड नाहीत. बांधकाम व्यवसायासाठी वेगळ्या व्यावसायिक दराने पाणी पुरविण्याची व्यवस्था नाही. यासह अनेक जणांकडे अद्यापही पाणीवितरणाचे मीटर नाही. ठराविक भागात अद्यापही मोटार लावून पाणी खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. या सर्वांकडून सध्या पाण्याची भरमसाट मागणी असून, शक्य तेथे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. यासह घरगुती कार्यक्रम असल्यास जादा पाण्याची अनेक कुटुंबीयांना गरज भासते. ती भागविण्यासाठी सध्या टॅँकर लॉबी सक्रिय झाली आहे.
निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून ७ मुख्य वाहिन्यांद्वारे शहरभरातील ८५ टाक्यांमध्ये प्रक्रिया केलेले पाणी पोहोचविले जाते. या टाक्यांपैकी रहाटणी ‘ड’ प्रभागाजवळ, पिंपळे सौदागर गावठाण, तळवडे, चिंचवड आदी ठिकाणी टाक्यांमधील पाणी टॅँकरमध्ये भरून विकण्याचा धंदा केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये हद्दीबाहेर टॅँकर व्यावसायिकांना होणारी पाणी विक्री, या पाणीवितरणात व फेऱ्यांच्या नोंदीमध्ये असणारी अनागोंदीचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर हद्दीबाहेर टॅँकरने पाणी विक्री होण्यास आळा बसला आहे. मात्र अद्यापही शहरात सार्वजनिक तसेच, खासगी जलस्रोतांद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. महापालिकेने एकीकडे मीटर पद्धत सुरू केली आहे. अशा स्थितीत शहरात इतर व्यावसायिकांसाठी पाणीवापराबाबत ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
शहरात कोठेही जलवाहिनी दुरुस्ती अथवा पाणीवितरणात बिघाड झाल्यावरच नागरिकांना टॅँकरने पाणी पुरविले जाण्याची वेळ येत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी टेंडर पद्धतीने टॅँकर व्यावसायिकांना ठेका देण्यात आला आहे. यासह खासगी टॅँकर व्यावसायिकांकडून जलकुंभांवरून पाण्याची मागणी झाल्यास त्यांना दहा हजार लिटरच्या टॅँकरसाठी ३०० रुपयांचे चलन भरावे लागते. मात्र या चलनापोटी किती रक्कम जमा होत आहे, किती टॅँकर पाणी वितरण झाले आहे याची माहिती देण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्सर चालढकल केली जात आहे.