नियमावली धुडकावल्याने गदारोळ
By admin | Published: June 24, 2017 06:08 AM2017-06-24T06:08:03+5:302017-06-24T06:08:03+5:30
महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांना प्रस्तावावर बोलू न देता बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करून घेण्याचा सपाटा भाजपाकडून लावण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांना प्रस्तावावर बोलू न देता बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करून घेण्याचा सपाटा भाजपाकडून लावण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मुख्य सभेत तहकुबीवर विरोधकांना मत मांडू देण्याची सभागृहाची परंपरा मोडीत काढून सभा नियमावली धुडकावण्यात आल्याने मोठा गदारोळ झाला. बहुमताचा गैरवापर करून भाजपाकडून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याची जोरदार टीका या वेळी विरोधी पक्षांनी केली.
शुक्रवारी मुख्य सभा संपत असताना महापालिकेने कर्जरोखे घेतले म्हणून भाजपाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडून सभा तहकुबी मांडली. याला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. या तहकुबीला विरोध असून यावर बोलायचे असल्याचे त्यांनी महापौर मुक्ता टिळक व नगरसचिव सुनील पारखी यांना सांगितले. त्यानंतर पारखी यांनी अभिनंदनाचा ठराव व तहकुबीवर मतदान घेतले. या वेळी ६३ विरुद्ध ३२ मतांनी हा ठराव व तहकुबी मंजूर करण्यात आली. मतदानानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाईल असे त्यांना वाटले होते; मात्र प्रत्यक्षात महापौरांनी लगेच कामकाजाचे पुढील विषय घेण्याचे निर्देश नगरसचिवांना दिले.
महापौरांच्या या कृतीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला. वस्तुत: सभा कामकाज नियमावलीनुसार विरोधकांना मत व्यक्त करण्याची संधी दिली जाणे आवश्यक होते. मात्र महापौरांकडून हा संकेत डावलला गेल्याने विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी याला जोरदार आक्षेप घेतला. विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्या जागेवरून उठून महापौरांसमोरील मोकळ्या जागेत आले. तहकुबीवर मत मांडण्याची संधी न देता केवळ बहुमताच्या जोरावर कामकाज करणे अयोग्य असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले.
सत्ताधारी भाजपा बहुमताच्या जोरावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामकाज चालवत असून, सभागृहाचे संकेत, नियमावली पायदळी तुडवली जात आहे. महापौर पक्षपातीपणा करत आहेत. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना असा प्रकार कधीही घडला नाही. भाजपाकडून बहुमताचा गैरवापर केला जात आहे. विरोधी पक्षाच्या सभासदांच्या मागण्या धुडकावून लावल्या जातात, अशी टीका माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, भय्यासाहेब जाधव आदी नगरसेवकांनी केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून चिडीचा नव्हे, तर रडीचा डाव खेळला जात आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली आहे.