हास्यास्पद घटना! रेल्वेत झुरळांचा सुळसुळाट; प्रवाशांनी पुणे स्टेशनवर रोखली दीड तास रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:54 AM2023-08-06T11:54:50+5:302023-08-06T11:55:00+5:30
जोपर्यंत गाडीची स्वच्छता होत नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही असा प्रवाशांचा पवित्रा
पुणे : पनवेलहून नांदेडकडे जाणारी पनवेल-नांदेड एक्स्प्रेस झुरळांच्या त्रासामुळे प्रवाशांनी पुणे स्टेशनवर दीड तास रोखून धरली होती. रेल्वेच्या डब्यांमधील झुरळांमुळे प्रवासी अक्षरशः वैतागले होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
पनवेलहून नांदेडकडे निघालेल्या रेल्वे नं १७६१३ मध्ये एसी तृतीय श्रेणीतील कोचमध्ये झुरळांचा सुळसुळाट असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. प्रवाशांच्या आक्रमक भूूमिकेमुळे शेवटी गाडी पुणे स्टेशनवर थांबवण्यात आली. जोपर्यंत गाडीची स्वच्छता होत नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा प्रवाशांनी घेतला. त्यामुळे गाडी दीड तास प्लॅटफॉर्मवर उभी होती. यावरून रेल्वे प्रशासनाचे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येते. वंदे भारत एक्स्प्रेसला एकामागून एक हिरवा झेंडा दाखवला जातोय. परंतु साध्या प्रवासी रेल्वेगाड्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. रेल्वेत झुरळांची संख्या एवढी लक्षणीय असेल तर स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गाडी स्वच्छ करण्यात आली. ७ वाजून १५ मिनिटांनी आलेली गाडी ८ वाजून ४० मिनिटांनी पुण्यातून रवाना झाली.