छत्री घेऊन दुचाकीवर स्वारी, घडेल जेलची वारी; तुम्हाला दंड नव्हे, तर थेट मिळू शकते कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:52 PM2022-07-07T13:52:21+5:302022-07-07T13:52:32+5:30
दीपक होमकर पुणे : पावसाळा सुरू झाल्यावर दररोज दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होते. वेळेत शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या ...
दीपक होमकर
पुणे : पावसाळा सुरू झाल्यावर दररोज दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होते. वेळेत शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या ठिकाणी पोहोचणे गरजचेच. त्यात पाऊस पडला की मग उशीर होतो. रेनकोट घालून प्रवास करावा, मात्र कार्यालयात पोहोचल्यावर किंवा शाळेत पोहोचल्यावर तो काढून ठेवावा कुठे, याची पंचाईत. त्यामुळे शक्यता छत्री घेऊन प्रवास करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. कारण छत्री कार्यालयात किंवा शाळा, कॉलेजमध्ये ठेवणे सोयीची असते. मात्र, गाडी चालविताना छत्री धरणार कशी, एकतर मागच्या सीटवर कोणाला तरी बसवून छत्री धरायला लावणे किंवा मग स्वत:च एका हाताने छत्री धरून प्रवास करणे. या दोन्ही गोष्टी दुचाकी चालकांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे असा धोकादायक प्रवास करताना पोलिसांची दृष्टी तुमच्यावर पडली तर तुम्हाला दंड नव्हे, तर थेट कोठडी मिळू शकते.
वाहतूक नियमांचे पालन करून वाहनचालक गाडी हाकत असतात. मात्र, पावसाळ्यात परिस्थिती बदलते. अचानक आलेल्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी अनेकदा दुचाकीच्या मागे बसलेला दुचाकी चालकाच्या आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरून प्रवास करीत असतात. असा प्रवास करणे धोकादायक आहे. कारण हवेमुळे छत्री उडून दुसऱ्या वाहनचालकाला ती लागून अपघात होण्याची भीती असते. शिवाय शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या वाहनचालकाला छत्री लागून गंभीर इजा होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात. या स्थितीत वेगवान दुचाकी चालकास छत्री उडून अपघात होतात. त्यामुळे असे टाळण्यासाठी रेनकोट नसेल तर डोक्यावर छत्री, अथवा प्लास्टिकचा कागद धरून प्रवास केला जातो, असे करणे देखील धोकादायक आहे.
पावसात गाडी चालविताना घ्यायची काळजी
- पाऊस सुरू असताना गाडी चालविणे शक्यतो टाळाच.
- रस्त्यातच पाऊल लागला तर थांबा, इमारतीचा आडोसा घ्या.
- खूपच गडबड असेल तर गाडी अत्यंत सावकाश चालवा
- गाडीचे टायर गुळगुळीत झाले असतील तर तातडीने बदला
- हेल्मेट अवश्य वापराच.
- घराबाहेर पडताना रेनकोट सोबत ठेवा.
- रेनकोट ठेवण्यासाठी एखादी पिशवीही बरोबर असावी.
असा आहे नियम
मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे धोकादायक वाहन चालविण्यासंदर्भातील दंड शिक्षेची तरतूद आहे. छत्री घेऊन प्रवास करणे हे या कायद्याअंतर्गत येते. त्यामुळे तुम्ही छत्री घेऊन प्रवास केला तर तुमच्यावर कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल होतो. या खटल्याची सुनावणी न्यायालयात होऊन संबंधिताला शिक्षा सुनावली जाते.