शिक्षण मंडळाचे अधिकार पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांना
By admin | Published: August 28, 2015 04:38 AM2015-08-28T04:38:08+5:302015-08-28T04:38:08+5:30
शिक्षण मंडळाचे अधिकार महापालिकेला देण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळ व महापालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये फरक असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मदतीला
पुणे : शिक्षण मंडळाचे अधिकार महापालिकेला देण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळ व महापालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये फरक असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मदतीला महापालिकेतील एक अधिकारी देऊन अधिकार विभागणी केली होती. मात्र, आता आयुक्तांच्या माध्यमातून सर्व अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली.
शिक्षण मंडळाचा कारभार दोन-दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याने जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप सभासदांकडून मुख्य सभेत करण्यात आला. त्याचबरोबर, शिक्षण मंडळाचे अधिकारी शाळांमध्ये फिरकत नाहीत. शाळांचा दर्जा घसरत असल्याच्या तक्रारी सभासदांनी केल्या. तसेच, शालेय साहित्य अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नसल्याची तक्रार वैशाली बनकर यांनी केली. दीपक मानकर, अस्मिता शिंदे, अरविंद शिंदे यांनी शिक्षण मंडळाच्या तक्रारी मांडल्या. त्याबाबत उत्तर देताना राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘शिक्षण मंडळाला पूर्ववत सर्व अधिकार देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शिक्षणाधिकाऱ्यांकडेच सर्व अधिकार आयुक्तांच्या माध्यमातून दिले जातील. इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’’
शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांनी सांगितले, ‘‘एमकेसीएलचे ७६ लाख रुपयांचे बिल पेंडिंग आहे. ते बिल मिळाल्यानंतरच प्रशिक्षण देऊ, असे त्यांनी सांगितले आहे. लवकरच त्यांना बिल दिले जाईल.’’
शिक्षण मंडळाच्या शाळांना सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांना एक गणवेश दिला आहे. कोंढवा व वानवडी वगळता इतर शाळांना दप्तरे उपलब्ध करून दिली आहेत. ठेकेदाराला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ११ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. ती संपल्याने त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर, दिलेल्या साहित्याची तपासणी केली जाईल. निकृष्ट साहित्य आढळल्यास कारवाई बडगा उगारला जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
...त्या शिक्षकाची बदली करणार
मुलींची छेडछाड काढल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एका शिक्षकाची पुन्हा हडपसरमधील मुलींच्या शाळेत बदली करण्यात आल्याची तक्रार नगरसेवक फारूक इनामदार यांनी केली. ही नेमणूक चुकीची आहे. लगेच त्याची बदली रद्द करू. मुलींच्या शाळेत हा शिक्षक काम करणार नाही याची दक्षता घेऊ, असे स्पष्टीकरण राजेंद्र जगताप यांनी दिले.