मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, गर्दीवर राहणार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:59 AM2017-09-05T01:59:20+5:302017-09-05T01:59:38+5:30
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात राहणार आहे.
पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात राहणार आहे. मिरवणुकीत होणाºया प्रत्येक बारीक हालचालींवर पोलिसांसह सीसीटीव्हीच्याही ‘तिसºया डोळ्याची’ नजर राहणार आहे. प्रत्येक मंडळात तीन वाद्यपथकांची मर्यादा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीला उद्या (मंगळवारी) सकाळी नऊपासून सुरुवात होणार आहे. बंदोबस्तात पोलीस आयुक्त, सहआयुक्त, चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ३३ सहायक आयुक्त, २०४ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ७ हजार ८७० पोलीस शिपायांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत करणार आहे. बंदोबस्तासाठी पुण्याच्या बाहेरून ५ उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ६५ पोलीस निरीक्षक, ३० उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, २२० होमगार्ड व ३ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी मिळाल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीतील चोरीचे वाढते प्रकार पाहता मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे आणि गुन्हे शाखेचे पथक तयार आहे. प्रत्येक मंडळाला त्यांच्यासमोर तीन वाद्यपथके लावण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक पथकामध्ये २५ ढोल व ५ ताशांची मर्यादा घालून दिली आहे. डीजेच्या भिंती लावणाºया मंंडळांवर कारवाई केली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर आवाज मोजण्यात येणार असून, आवाजाची मर्यादा ओलांडणाºयांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, वाहतूक शाखेकडून स्वतंत्र बंदोबस्त दिला आहे. यामध्ये १ उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १०४ अधिकारी व १३९६ पोलिसांचा बंदोबस्तामध्ये राहणार आहेत. वाहतूक पोलिसांना पाचशे स्वयंसेवक बंदोबस्तामध्ये मदत करणार आहेत.
महापालिकेची व्यवस्था : सर्व घाटांवर बसवले आहेत कॅमेरे-
विसर्जनासाठी घाटांवर येणाºया गर्दीवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील १७ घाटांवर एकूण ५७ ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली असून या सर्व ठिकाणच्या गर्दीवर सीसीटीव्हीची नजर असेल. महापालिकेची कर्मचारी तसेच पोलीसही या कॅमेºयांचे मॉनिटरिंग करणार असून अनुचित गोष्ट निदर्शनास आल्यानंतर लगेचच त्याची दखल घेण्यात येईल.
विसर्जनासाठी सर्वच घाटांवर गर्दी होत असते. अग्निशमन दलाच्या वतीने त्यांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता या जवानांबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेही असतील. प्रत्येक घाटावर तीन किंवा चार कॅमेरे असतील. सर्व कोनांमधून ते गर्दीचे चित्रण करतील.