रिंगरोडबाधित शेतकऱ्यांना दिवाळीत मिळणार पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:33+5:302021-06-05T04:08:33+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यातील रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. एमएसआरडीसी ...
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यातील रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. एमएसआरडीसी आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून संयुक्त मोजणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादन लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या पिंपळोली आणि रिहे गावात संयुक्त मोजणी सुरू आहे. येथे ३४ हेक्टरची मोजणी पूर्ण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी १२ गावातील २५ टक्के मोजणी झाली होती. आतापर्यंत एकूण १७ गावातील ४० टक्के मोजणी पूर्ण झाली असून लवकरच उर्वरित गावातील मोजणीचे काम करण्यात येणार आहे.
----
अनेक गावातील शेतकरी भूसंपादनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत काम पूर्ण होईल. शेतकऱ्यांना पैसे वाटपाबाबत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत. त्यात भूसंपादनाचा मोबदला ठरवून दिवाळीत शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार आहे.
- संदीप पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
----
पॉइंटर्स
* एमएसआरडीसीच्या रिंगरोडची एकूण लांबी :- १७३ किलोमीटर
* रिंगरोडसाठी लागणारी एकूण जमीन :- १५७५ हेक्टर
* रिंगरोड उभारणीचा एकूण खर्च :- १७ हजार कोटी रुपये
* रिंगरोडसाठी आतापर्यंत भूसंपादन झालेली एकूण गावे :- १७ गावे
* भूसंपादनाची आतापर्यंत एकूण टक्केवारी :- ४० टक्के