हवेलीच्या अकरा गावांतील रिंगरोडची मोजणी महिन्यात करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:19+5:302021-04-02T04:11:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एमएसआरडीसीच्या रिंगरोडच्या हवेली तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एमएसआरडीसीच्या रिंगरोडच्या हवेली तालुक्यातील अकरा गावांतील मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. पुढील एक महिन्यात ही मोजणी पूर्ण करण्याची तयारी हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांनी केली आहे. सर्वांना बरोबर घेऊन रिंगरोडची मोजणी करण्यात येणार असल्याचे बारवकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याचा बहुप्रतीक्षित रिंगरोड रखडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यानंतर रिंगरोडच्या कामाला गती मिळाली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी देखील हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशमुख यांनी सर्व भूसंपादन अधिकारी आणि संबंधित प्रांत अधिकारी यांना रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली प्रांत सचिन बारवकर यांनी बुधवारी खानापूर येथे कृष्णाई मंगल कार्यालयात रिंगरोडबाबत घेरा सिंहगड, वडदरे, खामगाव मावळबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्याची जमीन सदर रस्त्यामध्ये जात आहे. त्या लोकांना रोड कुठून जाणार आहे व रस्ता कसा बनणार आहे. लोकांना कशा प्रकारे त्याचा मोबदला मिळणार हे हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले. नागरिकांनी विविध प्रश्न विचारले त्याचे त्यांनी सर्व प्रश्नाचे निरसन केले असून सर्वांनी संयुक्त मोजणी करायचे ठरवले. ३ ते ४ दिवसांत मोजणी खात्याशी व इतर सर्व यंत्रणा सदर गावात संयुक्त मोजणी करायचे ठरले. नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले. या बैठकीला या परिसरातील मंडलधिकारी, तलाठी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
---
पुणे (पश्चिम) चक्राकार मार्ग भूसंपादन
- एकूण गावे-११
- एकूण गट-९०१
- एकूण क्षेत्र-२२२.३४४३ हे. आर.
--
या गावातील मोजणी प्रकिया एक महिन्यात पूर्ण करणार
बहुली, भगतवाडी, सांगरुण, मांडवी बु., मालखेड, वरदाडे, खामगाव मावळ, घेरा सिंहगड, मोरदरवाडी, कल्याण, रहाटवडे.