31st December: हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना थेट जेलची हवा; 'थर्टी फर्स्ट' च्या बंदाेबस्तासाठी पुण्यात ३ हजार पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:25 AM2022-12-30T11:25:44+5:302022-12-30T11:27:14+5:30
पोलिसांकडून लष्कर परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी तपासणी
पुणे : तरुणाईकडून ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणारी गर्दी पाहता शहर पोलिस दलातील सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त रस्त्यावर असणार आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जाईल. त्याचबरोबर ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या कारवाया हाेतील. यात ब्रिथ ॲनलायझरचा वापर करण्यात येणार आहे.
पोलिसांकडून लष्कर परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी तपासणी केली आहे. याबरोबरच पोलिस अभिलेखावरून गुन्हेगारांचीही झाडाझडती घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा घातपात होणार नाही, महिलांची सुरक्षितता, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत बंदोबस्तावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकारी, गुन्हे शाखेच्या पथकांना ३१ डिसेंबर रोजी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिल्या आहेत.
शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून अशी होणार तपासणी
- पोलिस ठाणे, वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी
- मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’
- सोनसाखळीचोर, पाकीटमार यांच्यावर गुन्हे शाखेकडून ठेवला जाणार वचक
- महिलांबाबत गैरकृत्य केल्याचे आढळल्यास होणार कडक कारवाई
- हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना