दंगली घडवणे हा तर 'मविआ' सरकारच्या नियोजनाचा भाग; पुण्यात भाजपची आंदोलनातून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:30 AM2021-11-22T11:30:24+5:302021-11-22T11:40:40+5:30
त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरांत दंगली घडल्या होत्या
पुणे : त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरांत पुकारलेल्या बंदला व काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
या दंगली घडवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. विरोधी पक्षनेतेही दंगलीबाबत राज्य सरकारवर टीका करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दंगली घडवणे हा तर महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनाचा भाग आहे अशी टिकाही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे.
राज्यातील मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, कारंजा लाड या शहरांत बंदचे आवाहन करण्यात आले होते. पुण्यातही ग्रामीण भागात दंगलीमुळे जमाव बंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु दंगली घडवण्यात आल्या कि नाही यावर अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यात आज सकाळी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'हिंदू के सन्मान मै भाजप है मैदान मै' अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.
जगदीश मुळीक म्हणाले, त्रिपुरा मध्ये जी घटना घडली नाही ती घडल्याचं भासवून नांदेड , मालेगाव अमरावती याठिकाणी दंगली घडवण्यात आल्या आहेत. जे रजा अकादमीचे दंगेखोर होते. त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे महाविकस आघाडी सरकार करत आहे. या दंगेखोरांना पाठीशी घालून जे नागरिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम या सरकारने केले आहे. रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. महाविकस आघाडी सरकार दंगे थांबवण्यात अपयशी झाले. कारण हा तर या सरकारच्या नियोजनाचा एक भाग असल्याचे ते म्हणाले आहेत.