दौंडमध्ये दंगल

By admin | Published: April 16, 2015 11:02 PM2015-04-16T23:02:31+5:302015-04-16T23:02:31+5:30

शहरात दोन गटांत बुधवारी सायंकाळी दंगल झाली. यात एका पोलिसासह तीन युवक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांतील सुमारे ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Riots in Daund | दौंडमध्ये दंगल

दौंडमध्ये दंगल

Next

दौंड : शहरात दोन गटांत बुधवारी सायंकाळी दंगल झाली. यात एका पोलिसासह तीन युवक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांतील सुमारे ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परस्परविरोधी तक्रार दिली असून संशयित म्हणून ७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दंगल, बेकायदा शस्त्र बाळगणे, विनयभंग यासह अन्य गुन्हे दाखल केले असल्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी सांगितले.
दगडफेकीत जगदीश चौदर हा पोलीस जवान जखमी झाला. अशोक सोनोने, राजू वीरु, पप्पू सोनवणे (तिघेही राहणार भीमनगर, दौंड) हे तीन युवक जखमी झाले आहेत.
बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमाराला दोन गट रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ समोरासमोर आले. अचानक दोन गटांत दंगल उसळल्याने गावात तणावाचे वातावरण होते. राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. दंगलीतील दोन्ही गटाला आवरण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. अर्धा तास हा प्रकार सुरू होता. दंगलीचे लोण शहरात पसरल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले. नागरिक सैरावैरा धावत होते. दरम्यान, रात्री उशिराने शहरातील परिस्थिती हळूहळू निवळली होती. गुरुवारी मात्र, परिस्थिती पूर्वपदावर आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि पोलीस जवानांनी भेट दिली.
किशोर वाघमारे, करण वाल्मीकी, प्रभाकर पोते, बबलू पोते, संतोष साळवे, रवींद्र झोझे, संजू वाल्मीकी (सर्व रा. दौंड) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस जवान जगदीश चौदर यांनी तिसरी फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)

परस्परविरोधी तक्रारी
दौंड पोलिसांना नरेश वाल्मीकी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवार (दि. १४) रोजी दोन कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. नंतर हे प्रकरण मिटले होते. परंतु बुधवार (दि. १५) रोजी ५० ते ६० कार्यकर्ते रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ वाल्मीकीनगर येथे लोखंडी पाईप, तलवार, लाकडी दांडके घेऊन घरात घुसले आणि मारहाण केली. महिलांचा विनयभंगदेखील केला. अन्य दुसऱ्या तक्रारीत अशोक सोनवणे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता मी शालिमार येथे गेलो होतो. या ठिकाणी मला मित्र भेटले. मी परत येत असताना मंगळवारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ २० ते २५ जणांनी मला व माझ्या मित्रांना हॉकी, पाईप आणि तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Riots in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.