लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश नेवाळे स्थानबद्ध
By विवेक भुसे | Published: January 20, 2024 11:54 AM2024-01-20T11:54:29+5:302024-01-20T11:55:54+5:30
मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत...
पुणे : लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगाराला पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. ऋषिकेश ऊर्फ दगड्या भागवत नेवाळे (वय २२, रा. विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
ऋषिकेश नेवाळे याने साथीदारांसह समर्थ व विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तलवार, लोखंडी रॉड, पालघन, कोयता अशा घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, अपहरण, दुखापत, बेकायदेशीर हत्या बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत.
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी याप्रस्तावाची पडताळणी करुन नेवाळे याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी आता पर्यंत ८८ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.