बारामतीत कोरोनाचा वाढता आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:42+5:302021-04-03T04:09:42+5:30
बारामती: बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चढत असून दैनंदिन रुग्णसंख्येने आता २०० चा टप्पा ओलांडला आहे. ...
बारामती: बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चढत असून दैनंदिन रुग्णसंख्येने आता २०० चा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्यात गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध आणले होते. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप साधला गेला नाही. त्यामुळे बारामतीमधील स्थिती नियंत्रणात प्रशासन कोणती पाऊले याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण संचारबंदीला सर्वच स्तरांतून मोठा विरोध होत आहे. त्यामुळे संपूर्ण संचारबंदीचा निर्णय न घेता प्रशासनाला गर्दी रोखण्यासाठी कडक निर्बंधासह इतर उपाययोजना अजमावावे लागणार आहेत. असे असले तरी शहरातील गर्दीवर कोरोना रुग्ण वाढीचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. मास्क न वापरणे, मास्क असला तरी तो नाकातोंडाला न लावता हनुवटीला लावणे असे महाभाग शहरात सर्वत्र आढळून येतात. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर होणारी कारवाई फक्त शहरातील प्रमुख चौकामध्ये दिसून येते. मात्र पोलिस प्रशासनाने शहरातील शासकीय कार्यालये, बाजारपेठा, मोठी दुकाने, मॉल, खासगी रुग्णालये, हॉटेल, रिक्षा स्टॅन्ड, बसस्थानक परिसरात फिरत्या पथकांद्वारे तपासणी करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक तपासण्या बारामतीत होत असल्याने रुग्णांचा आकडाही मोठा दिसत आहे.
बारामतीमध्ये दररोज ६००च्या वर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. गर्दीची ठिकाणे शोधून तेथील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बारामती नगरपालिकेतही आता अनावश्यक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. शासकीय स्तरावरही तातडीच्या कामांसाठीच लोकांनी यावे असे आवाहन करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासन देखील रुग्णालयात बेड वाढवत आहे.
------------------------------------------------------------
संपूर्ण संचारबंदी न करण्याच्या केंद्राच्या सूचना आहेत. त्यामुळे जे हॉटस्पॉट आहेत तिथे निर्बंध कडक होतील. बारामती नगरपरिषद हद्दीत १९ आणि ग्रामीणमध्ये माळेगाव, कोऱ्हाळे बुद्रुक आणि पणदरे ही तीन गावे हॉटस्पॉटमध्ये येत आहेत. रुग्णसंख्या वाढली तर हॉटस्पॉट वाढवले जातील.
-दादासाहेब कांबळे
-उपविभागीय अधिकारी बारामती
-------------------------------------------------------------
- बारामतीची शुक्रवार (ता. २) स्थिती...
-• कालचे (ता. १) एकूण तपासलेले नमुने ६४९
-• एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१९७
-• शहर-११७ ग्रामीण- ७७.
-• एकूण रूग्णसंख्या- ९७५३
-• बरे झालेले रुग्ण- ८१४२
-• एकूण मृत्यू—१६५