वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:33+5:302021-05-20T04:11:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षभरात करडई, सूर्यफुलासह सर्वच खाद्यतेलाच्या भावात लि़टरमागे ४० ते ७० रुपयांची वाढ झाली ...

Rising inflation broke the backbone of the common man | वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले

वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षभरात करडई, सूर्यफुलासह सर्वच खाद्यतेलाच्या भावात लि़टरमागे ४० ते ७० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तब्बल चार वेळा झालेली दरवाढ झाली. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांचे गडगडणारे दर यामुळे मध्मवर्गीय गृहिणींचे मासिक अंदाजपत्रक पूर्णत: कोलमडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी महिलांच्या मासिक अंदाजपत्रकात तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अशा शब्दांत महिला वर्गामधून नाराजीचा सूर उमटत आहे.

गतवर्षीचा लॉकडाऊनचा काळ हा गृहिणींची परीक्षा घेणारा ठरला. मात्र हा कठीण काळ लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आयुष्यातून सरलेला नाही. लॉकडाऊन काळामध्ये घरातील कर्त्या पुरुषाची नोकरी जाणे, पगारकपात अशी संकट ओढवल्यामुळे गृहिणींना संसाराचा गाडा चालविणे अशक्य झाले आहे. त्यात आता सातत्याने होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीची भरच पडत चालली आहे. त्यामुळे वर्षभरापासून काटकसरीमध्ये आयुष्य जगावे लागणाऱ्या गृहिणींसमोर वाढत्या महागाईला तोंड द्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. करडई, सूर्यफुलासह सर्वच खाद्यतेलाचे भाव लिटरमागे ४० ते ७० रुपयांनी वाढले आहेत. 'करोना'च्या संकटामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता खाद्यतेलाच्या दरवाढीने महागाईत आणखी तेल ओतले आहे. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाचे भाव चांगलेच भडकले आहेत. भाज्यांचे दरदेखील वाढले आहेत. डिझेल आणि पेट्रोल वाढीमुळे मासिक अंदाजपत्रकाचे आर्थिक गणित बिघडले आहे. गॅस दरवाढीच्या सततच्या टांगत्या तलवारीमुळे गृहिणींना अंदाजपत्रक तयार करणे देखील अवघड झाले आहे.

------

खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)

तेल २०२१ २०२0

सूर्यफूल -2420/- 1700/-

शेंगदाणा -2375/- 2100/-

सोयाबीन -2060/- 1400/-

सरकी तेल -२१००/- १४५०/-

-----

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. भाज्यांचे दरही अधूनमधून वाढतच आहेत. गँस सिलेंडर, पेट्रोलच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत मासिक अंदाजपत्रकात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे- गायत्री पटवर्धन, गृहिणी

--------

वर्षभरात सर्वच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या किमती अजूनही उतरलेल्या नाहीत. त्या तुलनेत इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती महिन्याभरापासून स्थिर आहेत.

- सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ

-----------------------------------

Web Title: Rising inflation broke the backbone of the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.