वाढत्या महागाईने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:18+5:302021-06-05T04:08:18+5:30

वारंवार होणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीची चर्चा होत असते. मात्र कोरोना संकटापासून खाद्यतेलाच्या किमती जवळपास दुप्पट कधी झाल्या. त्यामुळे ...

Rising inflation has overwhelmed the general population in rural areas | वाढत्या महागाईने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता होरपळली

वाढत्या महागाईने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता होरपळली

googlenewsNext

वारंवार होणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीची चर्चा होत असते. मात्र कोरोना संकटापासून खाद्यतेलाच्या किमती जवळपास दुप्पट कधी झाल्या. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील पुढारीही खाद्यतेलाच्या वाढत्या बाजारभावाबद्दल आवाज उठवताना दिसत नाहीत.

खाद्यतेलामध्ये शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन आदी तेलांचा वापर करणाऱ्यांची संख्या देशात सर्वात जास्त आहे. तसेच मोहरी तेलाचाही वापर अनेक राज्यांत खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. मात्र, सर्वच खाद्यतेलाचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दुप्पट झाले आहेत. त्यामुळे ज्या घरात दरमहा पाच लिटर तेल वापरले जाते, त्या घरी दोन ते तीन लिटर तेल वापरण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना महामारीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर अनेकजण गावी परतले आहेत. लॉकडाउनच्या काळातच महागाई वाढत चालली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. लोकांना घरगुती खर्च भागविणेही कठीण जात आहे.

पेट्रोल ग्रामीण भागात १०० रूपये ९१ पैसे, डिझेल ९१ रूपये २४ पैसे, घरगती गॅस ८२० रूपये याबरोबरच खाद्यतेलाचेही दर दिवसेंदिवस वाढतच आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीने वाहनचालकांचे कंबरडे मोडल्याने, जीवनाश्यक वस्तूंचे भावसुद्धा वाढले आहे. किराणा मालातील अनेक वस्तूंचे भाव मागील एक वर्षात अनेक पटींनी वाढले आहेत. तेल, डाळीचे भाव गगनाला टेकले आहे. शेतमजूर महिलेला एक लिटर तेलाचा पुडा खरेदी करणाऱ्यांसाठी, तिला दिवसभर उन्हातान्हात घाम गाळून कमावलेल्या आख्ख्या एक दिवसाचा रोज एक लिटर तेलपुड्यासाठी द्यावा लागत आहे. गोरगरीब जनता कोरोना संकटामुळे अडचणीत आली असून, दररोज रोजगार मिळेल याची खात्री देखील नाही. यातच जीवनावश्यक वस्तूंची होत असलेल्या दरवाढीने, अगोदर बेजार झालेली जनता, वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीस आली आहे. त्यातच, डाळीचे भावसुद्धा कडाडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालेभाज्या, तेल, साखर, डाळ, अन्नधान्य महागल्याने गोरगरीब जनता कासावीस झाली असून, एक वेळच्या जेवणावरच उदरनिर्वाह करावा लागत आहे.

देशात पेट्रोल, डिझेलच्या किमतीने शंभरी गाठल्याने याचा परिणाम वाहतूकदारांवर झाला. वाहतुकीचे दर वाढले. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महागल्याने किराणा दुकानदार, व्यापाऱ्यांनी अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ केली. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही तर शेतीपयोगी मशागतीच्या कामाला सुरुवात झाली असून, महिलांना १०० ते २०० रुपये तर पुरुषांना २०० ते ३०० रुपये रोज मिळतो.

--

तेल असो हॉटेलमधील दाळ, शंभरची नोट पडते खर्ची

तेलाच्या किमतीमध्ये सोयाबीन तेल १५५ ते १७५ रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचले आहे. तुरीची डाळ ११० रुपये किलो, मिरचीपासून तर मसाल्याच्या पदार्थापर्यंत सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले. पालेभाज्यासुद्धा कडाडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगावे की मरावे, हा प्रश्न निर्माण झाला.

जेवणावळी, हॉटेल, धाब्यावर जेवण महागले असून, दाल फ्रायला १२० ते १३० रुपये मोजावे लागते.

--

कोट

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढले असून, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने व जीवनावश्यक सर्वच किराणा मालाचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढतच आहेत; त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात किराणा मालाचे इतर वस्तूंचे दरही वाढले आहेत. गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांनी कसे जगावे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

संध्या नवले, गृहिणी, वाल्हे.

--

कोट -२

डिझेल दरवाढीमुळे वाहनमालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे किराणा वस्तूंचा वाहतूकखर्च वाढला आहे. त्याचबरोबर होलसेल माल खरेदी करताना गतवर्षीपेक्षा या वर्षी किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाईने, गिऱ्हाईक दुकानातील वस्तू खरेदी करण्यासाठी, कमी प्रमाणात येतात. जेमतेम माल खरेदी करीत आहेत.

- प्रसाद कुमठेकर, किराणा माल व्यावसायिक, वाल्हे.

Web Title: Rising inflation has overwhelmed the general population in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.