पॉर्न पाहण्याचे वाढते प्रमाण, नैराश्य ठरतंय महिला अत्याचारांना कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 02:25 PM2022-05-15T14:25:49+5:302022-05-15T14:26:01+5:30
पुणे : पॉर्न पाहण्याचे वाढते प्रमाण, एकटेपणाने आलेले नैराश्य, एकतर्फी प्रेम, लग्नाचे आमिष दाखवून शोषण अशा कारणांमुळे महिला आणि ...
पुणे : पॉर्न पाहण्याचे वाढते प्रमाण, एकटेपणाने आलेले नैराश्य, एकतर्फी प्रेम, लग्नाचे आमिष दाखवून शोषण अशा कारणांमुळे महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात बलात्काराचे 97, तर विनयभंगाचे 187 गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्या तरी लोकप्रतिनिधी आणि समाजातूनही याविरुद्ध आवाज उठवला जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा बसावा याकरिता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ‘शक्ती कायदा’चे विधेयकही मंजूर करण्यात आले आहे; पण कायद्याच्या अंमलबजावणीला अद्यापही मुहूर्त नाही. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पोक्सोसारखा कडक कायदाही करण्यात आला आहे. मात्र, तरीही आरोपींमध्ये कायद्याविरुद्ध दहशत बसलेली नाही. शहरातील वर्षभरातील आकडेवाडी पाहिली तर महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा आकडा वाढतच आहे. कोरोना काळात तर महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. हातात मोबाइलसारखे चोवीस तास ॲक्टिव्ह असणारे खुळखुळे आल्याने पॉर्न पाहण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. यातच आता कोरोनामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचीच नोकरी गेल्याने माहेरून पैसे आणण्यासाठी सासरकडच्यांकडून विवाहित महिलांचा छळ सुरू आहे. सातत्याने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारामुळे महिला आत्महत्येचा मार्गही पत्करत आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे, महिला आणि मुलींवरील अत्याचारामध्ये ओळखीतील व्यक्तीचेच प्रमाण अधिक आहे. लग्नाच्या आमिषामधून अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या घटनाही वाढत आहेत. ही महिला आणि मुलींवरील अत्याचाराची वाढती संख्या चिंताजनक आहे.
महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दाखल गुन्ह्यांची संख्या
बलात्कार 97
विनयभंग 187
अपहरण 227
विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक 131